पक्षश्रेष्ठी ठरवणार वारसदाऱ़़
By Admin | Updated: September 24, 2014 00:46 IST2014-09-24T00:42:17+5:302014-09-24T00:46:04+5:30
लातूर : राज्य व देशपातळीवर लातूर जिल्हा परिषदेने लौकिक केला आहे़ तो आणखीन वाढावा म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील दोन गावांची निवड करुन ती

पक्षश्रेष्ठी ठरवणार वारसदाऱ़़
लातूर : राज्य व देशपातळीवर लातूर जिल्हा परिषदेने लौकिक केला आहे़ तो आणखीन वाढावा म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील दोन गावांची निवड करुन ती गावे स्वयंपूर्णच नव्हे तर आयडीएल बनवून नवा लातूर पॅटर्न निर्माण करण्याची संकल्पना असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी मंगळवारी दिली़
लातूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर व उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देऊन मुक्त संवाद साधला़ पुढे कव्हेकर म्हणाल्या, जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यामुळे प्रत्येक गावांना सोयी- सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे़ लातूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्याचा ठसा राज्याबरोबरच देशातही उमटविला आहे़ जिल्ह्यातील २०० अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे़
आजचा विद्यार्थी हा नवनवीन आव्हाने पेलणारा व्हावा तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांत आणखीन दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सेमी इंग्लिश, ई- लर्निंग असे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत़ हे उपक्रम अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरु असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे येण्याचा कल कमी होत असल्याचे सांगून कव्हेकर म्हणाल्या, ज्येष्ठ नेत्यांनी निर्माण केलेल्या आदर्शनुसार कार्य करणार आहे़ विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे़
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने शेळ्या- मेंढ्या वाटप यासह अन्य योजना राबविण्यात येतात़ त्याचा लाभ घेण्यासाठी रीघही लावली जाते़ योजनेचा लाभ मिळाला की अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच योजनेतून मिळालेल्या शेळ्या- मेंढ्या विक्री केल्या जातात़ त्यामुळे शासनाचा मूळ हेतू साध्य होत नाही़ फुकट मिळत असल्याने नागरिकांत ही मानसिकता निर्माण झाली असून ती बदलणे आवश्यक आहे़ शेतकऱ्यांसाठी दूध डेअरीची योजना आहे़ परंतु, शेतकऱ्यांची अनास्था असल्याने त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा आता वारसदार कोण राहणार? असे विचारले असता कव्हेकर म्हणाल्या, पक्षश्रेष्ठीच या पदाचा वारसदार ठरविणार आहे़ त्याचबरोबर आपल्या कामात माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा कधीही हस्तक्षेप नसतो, असे त्यांनी सांगितले़ निसर्गाच्या असंतुलनामुळे पाऊस कमी होत आहे़ पाणीटंचाईमुक्तीसाठी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येईल़
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी छोटे- छोटे उद्योग उभारणीवर भर देण्यात येणार आहे़ घरकुल वाटपासाठीच्या ८० टक्के याद्या पूर्ण झाल्या आहेत़ छोट्या गावांतील यादीतील कुटुंबांना घरकुले वाटप झाली असून आता मोठ्या गावांमध्ये घरकुल निर्मितीचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले़