आरोग्य उपकेंद्र आजारी
By Admin | Updated: August 19, 2014 02:10 IST2014-08-19T01:00:01+5:302014-08-19T02:10:55+5:30
साहेबराव केंद्रे , माळहिप्परगा येथे सहा महिन्यांपूर्वी जवळपास १६ लाख रुपये खर्चुन आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली़ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ही

आरोग्य उपकेंद्र आजारी
साहेबराव केंद्रे , माळहिप्परगा
येथे सहा महिन्यांपूर्वी जवळपास १६ लाख रुपये खर्चुन आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली़ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ही इमारत कुलूपबंद आहे़ परिणामी खेड्यातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे़
ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजना उपक्रमाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत़ त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च होत आहे़ परंतु, काही दुर्लक्षामुळे खेड्यातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे़
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा हे ६ हजार लोकवस्तीचे गाव आहे़ या गावासह परिसरातील खेड्यामधील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आरोग्य उपकेंद्राची उभारणी करण्यात आली़ या उपकेंद्रास इमारत आवश्यक असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापूर्वी १६ लाख रूपये खर्च करण्यात आले़ रंगरंगोटीसह अन्य कामे करण्यात आल्याने आरोग्य सेवा मिळेल, अशी अपेक्षा रूग्णांकडून व्यक्त केली जाऊ लागली़ सुरवातीचे दोन महिने आरोग्य सेवा मिळालीही़ परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे़ माळहिप्परग्याचे उपकेंद्र असल्याने याठिकाणी दोन परिचारिकांची सुरवातीस नियुक्ती झाली़ त्यानंतर एका परिचारिकेची बदली झाली़ सध्या एकाच परिचारकावर आरोग्य उपकेंद्राचा भार आहे़ परंतु, या परिचारकास जवळपासची चार गावे जोडून देण्यात आल्याने दररोज त्यास या गावांना भेटी देऊन पाहणी करावी लागत आहे़ माळहिप्परग्याच्या नव्या इमरतीत गरोदर महिलांना तपासण्यासाठी खोली, इतर रूग्णांना तपासण्यासाठी स्वतंत्र खोली यासह अन्य दोन खोल्या आहेत़ सुरुवातीस आरोग्य सेवा मिळू लागल्याने रूग्णांचा ओढाही वाढला होता़ आरोग्य केंद्राला कुलूप लागल्याने या भागातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे़ परिणामी खाजगी दवखान्याचा आधार घ्यावा लागत आहे़ उपकेंद्राची ही इमारत केवळ शोभेसाठीच असलेली पहावयास मिळत आहे़ इमारतीस कुलूप असल्याने काही विघ्नसंतोषींनी तिची नासधूसही केल्याचे पहावयास मिळत आहे़