आरोग्य केंद्रे वाऱ्यावर
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T00:05:55+5:302014-06-25T01:04:14+5:30
बीड: कुठे वैद्यकीय अधिकारी नाहीत तर कुठे नर्सचा पत्ता नाही़ एकाही ठिकाणी शस्त्रक्रिया होत नाहीत की, रुग्णांवर उपचाऱ़़ हे विदारक चित्र आहे

आरोग्य केंद्रे वाऱ्यावर
बीड: कुठे वैद्यकीय अधिकारी नाहीत तर कुठे नर्सचा पत्ता नाही़ एकाही ठिकाणी शस्त्रक्रिया होत नाहीत की, रुग्णांवर उपचाऱ़़ हे विदारक चित्र आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांचे़ खुद्द केंद्रीय समितीनेच हे सारे चित्र अनुभवले अन् नाराजीही व्यक्त केली़
जिल्ह्यातील माता व बालकांच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातील डॉ़ अजय पटले यांची एक सदस्यीय समिती जिल्ह्यात दाखल झाली़ त्यांच्यासमवेत युनिसेफच्या डॉ़ नेहा वाघ या देखील आल्या आहेत़ देशभरातील १८४ जिल्हे केंद्र सरकारने अतिजोखमीची जाहीर केलेली असून राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे़ या नऊमध्ये बीड देखील आहे़ माता, बालमृत्यू प्रमाण, स्त्री- पुरुष लिंगगुणोत्तर प्रमाण याचे निकष लावून केंद्र सरकारने या जिल्ह्यांवर ‘फोकस’ केला आहे़
त्यानुसार माता व बालकांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या या समितीने सोमवारी केज, पाटोदा, आष्टी या भागात एकूण नऊ आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या़ यावेळी काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नव्हते़ काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर शिक्षणासाठी रजाच टाकून गेलेले आढळले तर काही केंद्रांवर नर्सही गायब होत्या़ ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची ही वाताहत पाहून ही समितीही अवाक् झाली़
महिला, शिशूंसाठी १०० खाटा
जिल्हा रुग्णालयात खाटा कमी अन् प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला जास्त असे चित्र आहे़ त्यामुळे महिला व बाळांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचा कक्ष उभारण्याची गरज आहे़ तशी शिफारस आपण केंद्राकडे करणार आहोत असे डॉ़ अजय पटले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
समितीने के लेल्या सूचना़़़
४जिल्ह्यात रोजगाराचे साधन नाही़ ऊसतोडीसाठी लोक बाहेरगावी जातात़ त्यामुळे आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही़ त्यामुळे लोकांच्या हातांना काम मिळावे जेणेकरुन ते आरोग्याकडे लक्ष देतील़
४प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, नर्सेसची रिक्त पदे भरली जात नसल्याने सुविधा पुरविण्यात अडचणी आहेत़ ही पदे भरण्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करणाऱ
४जिल्ह्यातील गरोदर मातांना व्यवस्थित पोषण आहार मिळत नाही़ त्यांना पुरक आहार हवाच
४राज्यात बालमृत्यूचे प्रमाण दरहजारी २४ इतके आहे़ बीडमध्ये ते १६ आहे़ प्रमाण कमी असले तरी बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाय हवेत़
४बाळाची पूर्ण वाढ झाल्याशिवाय डिलेव्हरी होऊ नये़ बाळ जन्मानंतर अडीच किलो असावे़
४राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी ३९ समित्या तयार केल्या आहेत़
४माता, शिशू, किशोरवयीन मुले, मुली यांच्या आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन व उपाय हवेत़
४आरोग्य सुविधेचे योग्य नियोजन व काटेकोर अंमलबजावणी असायला हवी.
समितीची जिल्हा रूग्णालयास भेट
मंगळवारी समितीने जिल्हा रुग्णालयात भेट दिली़ यावेळी समितीने बाल व माता उपचार विभागांना भेटी दिल्या़ यावेळी शिशूंच्या अतिदक्षता विभागाचीही पाहणी झाली़ यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे, जिल्हा बालप्रजनन अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे उपस्थित होते़ जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांची देखभाल याबाबत डॉ़ अजय पटले यांनी समाधान व्यक्त केले़
दोन तास रुग्ण, नातेवाईक ताटकळत
केंद्रीय समितीजिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयाचे दोन्ही प्रवेशद्वार कुलूपबंद केले़ त्यामुळे रुग्णालय आवारात थांबलेले नातेवाईक व नव्याने आलेल्या रुग्णांना बाहेरच ताटकळत थांबावे लागले़ तब्बल दोन तास प्रवेशद्वार उघडले नाही़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल झाले़ कुलूप उघडण्याची मागणी करत नातेवाईकांनी गोंधळ घातला; पण समिती बाहेर पडल्यावरच सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार उघडले़