लॉकडाऊनपेक्षा गड्या आपला गाव बरा; अनेक मजूर, कामगारांनी धरली गावाकडची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:42 IST2021-04-10T12:41:33+5:302021-04-10T12:42:25+5:30
corona virus in Aurangabad ब्रेक दि चेन मिशन सुरू झाले असून, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूवगळता हॉटेल, कापड व्यवसाय, पॅकेजिंग अशा अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

लॉकडाऊनपेक्षा गड्या आपला गाव बरा; अनेक मजूर, कामगारांनी धरली गावाकडची वाट
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : मागील लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय व छोट्या खेड्यातील कामगारांचे हाल झाले. करमाडजवळ झालेल्या अपघातात २० मजुरांचा बळी गेल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे लॉकडाऊन झाल्याने हॉटेल व दुकाने बंद असल्याने कामगारांचे हातचे काम गेले आहे. उपाशीपोटी राहण्यापेक्षा गावाकडे जाणे पसंत केले आहे.
ब्रेक दि चेन मिशन सुरू झाले असून, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूवगळता हॉटेल, कापड व्यवसाय, पॅकेजिंग अशा अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अधिक लोकांची गर्दी होऊन पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्हा हादरून गेला आहे. पूर्वी ज्येष्ठांनाच कोरोनाचा धोका होता; परंतु आता बालकांपासून ते ज्येष्ठापर्यंत कोरोना विळखा वाढत चालला आहे. लॉकडाऊन झाले असले तरी कुणाच्याही मदतीचे हात पुढे आले नाहीत. खोली भाडे द्यायचे कसे आणि खायचे काय, निर्बंध आणखी कडक केल्यास शहरात राहणे कठीण होणार आहे. खानावळी बंद असल्याने जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हळूहळू स्थलांतर होत आहे.
संचारबंदीत एकाच ठिकाणी जास्तीचे लोक जमू नये, दंडात्मक कारवाई केली जात असल्याने हातचे काम गेलेले कामगार शहरातून काढता पाय घेतला दिसत आहेत. बांधकाम व्यावसायिकांचे काम सुरू असल्याने मजूर तेथे कामावर आहेत. कारखान्यातही दररोज तपासणी करून कामगारांना कामावर रुजू करून घेतात. कॉर्पोरेट सेक्टरची बहुतांश कामे घरूनच सुरू असल्याचे चित्र आहे. परंतु हॉटेल, दुकान व स्टेशनरी तसेच इतर व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कामगारांना शहर सोडल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
लांब पल्ल्याच्या गाड्यासह जवळच्या गावाकडेही ओढा...
लॉकडाऊनमध्ये अजून कडक निर्बंध लागल्यास खाण्यापिण्याचे वांदे होणार आहे. या भीतीने आणि गतवर्षीच्या अनुभवावरून काढता पाय घेण्यावर कामगारांचा भर आहे. बांधकाम व्यवसायातही म्हणावी तशी कामाला संधी नाही, मोजकेच मजूर कामावर टिकून आहेत. हातचे काम जाण्याच्या भीतीने कामगार ते टिकविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मजुरांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्नही भेडसावत आहे. हॉटेल व्यवसाय तसेच खानावळीत काम करणाऱ्यांना बांधकामावर जाण्याची वेेळ आली आहे. आठ दिवस काम मिळेल याची खात्री नसल्याने व खोलीभाडे देणे कठीण झालेले आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अनेकजण वाट पाहत आहेत.
लॉकडाऊनने काम बंद, खायचे काय...
टाॅवरचे काम करण्यासाठी दहा ते वीस लोकांचा ग्रुप होता. परंतु लॉकडाऊन लागल्याचे जाहीर झाले आणि गत वर्षीसारखे अडकून पडायचे नाही. त्यामुळे गावाकडचे घर गाठणे पसंत केले. कुटुंबात राहून अर्धपोटी जगता येईल. परंतु बाहेरून कुटुंबाला काय मदत करणार, असा प्रश्न आहे.
- सलिम बेग
मजुरांची तारांबळ वाढली...
लॉकडाऊनमुळे मोठ्या व्यावसायिकांच्या साइट बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. सध्या जगण्याची चिंता भेडसावू लागली आहे. कारखान्यातून जीवनाश्यक वस्तूंच्या मालाची ने-आण होत आहे. इतर मालाच्या गाड्या भरत नाहीत, त्यामुळे मजुरांची संख्याही रोडावली आहे.
- शुभम भारसाखळे
हॉटेल व्यवसाय बंद झाले..
शहरातील विविध मुलांच्या हाताला काम देणारा हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार वाढले आहेत. कारखान्यात हमाली व इतर काम कठीण वाटते. त्यामुळे बहुतांश मुलांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पोटासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी आहे.
- प्रशांत बनकर