मुख्याध्यापकांच्या चुका, विद्यार्थ्यांना फटका !

By Admin | Updated: February 4, 2016 00:35 IST2016-02-04T00:33:51+5:302016-02-04T00:35:58+5:30

उस्मानाबाद : एकीकडे अतिरिक्त शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने करीत आहेत, तर दुसरीकडे पाचवी, आठवीच्या वर्गांना एकेक वर्ष शिक्षक मिळत नाहीत.

Headmasters' mistakes, students shocked! | मुख्याध्यापकांच्या चुका, विद्यार्थ्यांना फटका !

मुख्याध्यापकांच्या चुका, विद्यार्थ्यांना फटका !


उस्मानाबाद : एकीकडे अतिरिक्त शिक्षक नियुक्तीसाठी आंदोलने करीत आहेत, तर दुसरीकडे पाचवी, आठवीच्या वर्गांना एकेक वर्ष शिक्षक मिळत नाहीत. हा सर्व गुंता २०१५-१६ ची संचमान्यता नसल्यामुळे वाढला होता. पाच-सहा दिवसांपूर्वी संचमान्यताही आली. परंतु, येथेही माशी शिंकली. जिल्हाभरातील जवळपास १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी वर्गखोल्यांची संख्याच कमी दर्शविली. त्यामुळे त्यामुळे शिक्षकांची अपेक्षित पदे मंजूर होऊ शकली नाहीत. मुख्याध्यापकांच्या या दुर्लक्षित कारभारामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन् निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपूर्वी निमशिक्षकांनाही जिल्हा परिषद शाळेवर नियुक्ती देण्याबाबत शासनाने आदेश काढले. परंतु, जिल्हा परिषदेकडे रिक्त पदे निसल्याने हा प्रश्न वर्षागणिक जटील बनत गेला. असे असतानाच दुसरीकडे शिक्षक नाहीत, म्हणून नव्याने सुरू करण्यात आलेले पाचवी आणि आठवीचे वर्ग जवळपास ओस पडले आहेत. पदे मंजूर नसल्याने या वर्गांना शिक्षक देता येत नव्हते. त्यामुळे सातत्याने आंदोलने होत असत. त्यावर शिक्षण विभागाकडूनही ‘२०१५-१६ च्या संचमान्यता आल्यानंतर नियुक्ती देवू’, हे ठरलेले आश्वासन दिले जात असे. महत प्रतीक्षेनंतर म्हणजेच पाच-सहा दिवसांपूर्वी सदरील संचमान्यता आली. त्यामुळे सर्वांच्याच आशा उंचावल्या होत्या. परंतु, जिल्हाभरातील सुमारे १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘सरल’ प्रणालीमध्ये वर्गखोत्यांची अचूक माहिती न भरल्यामुळे अपेक्षित पदे मंजूर होवू शकली नाहीत. कारण ‘आरटीई’नुसार एका वर्गासाठी एक शिक्षक दिला जातो. मात्र, उपरोक्त मुख्याध्यापकांनी वर्गखोल्या आहेत, त्यापेक्षा कमी दाखविल्या आहेत. त्यामुळे सहाजीकच मंजूर शिक्षकांची पदेही कमी झाली आहेत. त्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांसोबतच जिल्हाभरातील अतिरिक्त गुरूजी आणि निमशिक्षकांनाही सोसावा लागत आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्याबाबत संबंधितांना आदेशित केले आहे. त्यानुसार प्रक्रियाही करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्याने सादर करण्यात येणाऱ्या सदरील माहितीला शासनाकडून किती दिवसांत हिरवा कंदिल मिळणार? याचे उत्तर ना अधिकाऱ्यांकडे आहे, ना संबंधित मुख्याध्यापकांकडे.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षित कारभाराकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी लक्ष देण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Headmasters' mistakes, students shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.