संपर्क प्रमुखांनी उपटले सर्वांचे कान
By Admin | Updated: June 26, 2014 00:59 IST2014-06-26T00:48:26+5:302014-06-26T00:59:25+5:30
पैठण : विधानसभा उमेदवारीच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये संपर्क प्रमुखांसमोर साठमारी सुरू असतानाच अंबादास दानवे यांना पैठणमधून मोठी मागणी आहे, असा गौप्यस्फोट खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.

संपर्क प्रमुखांनी उपटले सर्वांचे कान
पैठण : शिवसेनेच्या मेळाव्यात विधानसभा उमेदवारीच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये संपर्क प्रमुखांसमोर साठमारी सुरू असतानाच अंबादास दानवे यांना पैठणमधून मोठी मागणी आहे, असा गौप्यस्फोट खा. चंद्रकांत खैरे यांनी केला. यावेळी अंतर्गत संघर्ष लक्षात घेऊन संपर्क प्रमुख विनोद घोसाळकरांनी गटबाजी कराल तर जागा भाजपाला सोडू, असा दम देत सर्वांची खरडपट्टी काढली.
‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पैठण येथे झेंडू महाराज मठात बुधवारी घेण्यात आलेल्या मेळाव्यात शिवसैनिकांच्या बेशिस्त वर्तनाची वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. मेळाव्यासाठी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, खा.चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार संदीपान भुमरे, उपजिल्हा प्रमुख विनायक हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ठिकाणी संदीपान भुमरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत दावेदारांची संख्या वाढलेली असताना या दावेदारांतील गटबाजी या मेळाव्यात दिसून आली.
संदीपान भुमरे यांनी मी शिवसैनिक असून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करील; परंतु तालुक्यात मला पक्षाने उमेदवारी दिली असे म्हणत दोन-चार जण प्रचार करीत आहेत, शिवाय तालुक्यात कोटीने रुपये खर्च करण्याची भाषा वापरत आहेत. याबाबीकडे विनोद घोसाळकर यांचे लक्ष वेधले.
खासदार खैरे यांनी पैठण तालुक्यात शिवसैनिक व शिवसेनेला इतिहास असून गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा देत पैठण तालुक्यात उमेदवार फक्त धनुष्यबाण असेल असे घोषित केले. दरम्यान, अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.
प्रास्ताविक प्रकाश वानोळे यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख विजय जाधव, शहर प्रमुख प्रकाश वानोळे, न.प. गटनेता राखी परदेशी, नगरसेवक दत्ता गोर्डे, मंगल मगर, तुषार पाटील, ललिता पोरवाल, नंदलाल काळे, अरुण काळे, सोमनाथ परदेशी, अजय पोरवाल, किशोर वैद्य आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)
नवा की जुना चेहरा, हे पक्ष प्रमुख ठरवतील
खासदार खैरे व माजी आमदार संदीपान भुमरे यांच्यातील मतभेद जिल्हाभर उघड असले तरी आजच्या मेळाव्यात खासदार खैरे यांनी भुमरे व माझे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. मधले काही दोन-चार जण काड्या करतात, असे सांगून भुमरे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला भुमरे यांना दिला; मात्र आपल्या भाषणादरम्यान भुमरेंना कोपरखळ्या मारण्यास ते विसरले नाहीत. अंबादास दानवे यांनाही पैठण तालुक्यातून मोठी मागणी आहे. असा राजकीय बॉम्बगोळा टाकून खैरे यांनी टाकला. नवा की जुना चेहरा हे पक्ष प्रमुख ठरवतील, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसैनिकाला बोलू दिले नाही
तालुका प्रमुख विजय जाधव भाषण करीत असताना एका शिवसैनिकाने व्यासपीठावर जाऊन मला बोलू द्या, अशी आग्रही मागणी केली. उपस्थित शिवसैनिकांनी त्याला बोलू द्या, असा नारा लगावला. शिवसैनिकांतील गटबाजीच्या अनुषंगाने काही बोलेल अशी धास्ती धरलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला बोलू न देता व्यासपीठावरून खाली उतरवले. यामुळे मेळाव्यात गोंधळ उडाला. अंबादास दानवे यांनी रोखठोक आवाहन करीत मेळावा पुन्हा शिस्तीत आणला.