मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:28+5:302021-02-05T04:17:28+5:30
मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, जय किसान आंदोलन, स्वराज अभियान, समाजवादी जनपरिषद व टेलिफोन कर्मचारी संघटना ...

मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देणार
मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, जय किसान आंदोलन, स्वराज अभियान, समाजवादी जनपरिषद व टेलिफोन कर्मचारी संघटना यात सहभागी होतील.
मराठवाडा लेबर युनियनचे कार्यालय, नारळीबाग येथून या मोटारसायकल रॅलीला सुरुवात होईल. औरंगपुरा येथील फुले दांपत्याच्या पुतळ्यास अभिवादन करून पैठण गेट, सिल्लेखाना मार्गे जाफरगेट, शहागंजातील गांधी पुतळा व तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भडकलगेट येथे येऊन रॅली विसर्जित होईल. सकाळी ९ वाजता निवृत्त न्यायाधीश प्रकाश परांजपे यांच्याहस्ते नारळीबागेत ध्वजारोहण होईल.
यासंदर्भात सुभाष लोमटे यांनी सांगितले की, शेतीमाल हमीभावाबद्दल केंद्र सरकार लिहून द्यायला तयार आहे. पण कायदेशीर संरक्षण देण्यास नकार देते, हे गौडबंगालच होय. देशातील बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून त्यावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात १५० शेतकरी मृत्युमुखी पडूनही, चकार शब्दही काढत नाहीत, हा प्रकार चीड आणणारा असल्याची संतप्त प्रतिक्रिया ॲड. विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केली.
त्यांनी आरोप केला की, तीनही कृषी कायदे तांत्रिकदृष्ट्या संसदेत मंजूर झाले असले तरी, या कायद्याचे स्पिरिट संवैधानिक नाही. कृषिमंत्र्यांनी हे आंदोलन चिघळवले. त्यांची प्रारंभापासूनची भूमिका अशीच आहे. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे.
माथाडी कायद्याच्या चौकटीतील कायदेशीर प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले गेले असल्याने त्या सर्व प्रश्नांचा निपटारा तात्काळ करावा म्हणून २५ दिवसांपासून कामगार उपायुक्त कार्यालयावर माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. याबाबतीत तात्काळ तोडगा काढला गेला नाही, तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा लोमटे व ॲड. सुभाष सावंगीकर यांनी या पत्रपरिषदेत दिला.