साठवणीच्या पाण्यावर घेतले हळदीचे पीक
By Admin | Updated: January 14, 2016 23:25 IST2016-01-14T23:20:37+5:302016-01-14T23:25:07+5:30
परभणी ; विहिरीतील साठवणीच्या पाण्याचा आधार घेऊन ठिबक सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर करून परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्याने हळदीचे पीक घेतले़ कमी पाण्यावर पाच एकरात घेतलेले पीक बहरात आले आहे़

साठवणीच्या पाण्यावर घेतले हळदीचे पीक
परभणी ; विहिरीतील साठवणीच्या पाण्याचा आधार घेऊन ठिबक सिंचनाद्वारे या पाण्याचा वापर करून परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्याने हळदीचे पीक घेतले़ कमी पाण्यावर पाच एकरात घेतलेले पीक बहरात आले आहे़
तालुक्यातील झरी येथील शेतकरी संतोष देशमुख यांनी हा प्रयोग केला आहे़ मागील चार वर्षांपासून निसर्गाने साथ सोडली आहे़ अशा स्थितीत हताश न होता, संतोष देशमुख यांनी शेतात विविध प्रयोग राबविले़ शेतातील विहिरीत साठवलेल्या पाण्याचा त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे वापर करून मागील आठ महिन्यांपूर्वी शेतात हळद पिकाची लागवड केली़ पाच एकर शेतामध्ये ४ बाय ४ प्रमाणे ही लागवड करण्यात आली़ या पिकातून त्यांना एकरी दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे़ एका एकरात त्यांनी काही क्विंटलची हळद लावली़ संतोष देशमुख यांना २० एकर शेती जमीन आहे़ यामध्ये त्यांनी पारंपारिक पिकेही घेतली़ पारंपरिक पिकातून त्यांना चांगले उत्पन्न झाले़ दोन एकरमध्ये तूर तर काही ठिकाणी कापूस लावला़ मात्र दुष्काळामुळे जास्त उत्पन्न हाती आले नाही़ केवळ हळदीच्या पिकाने जीवनदान दिले़
हळदीची लागवड करण्यासाठी त्यांना ३ लाख रुपयांचा खर्च झाला़ संतोष देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीत कापूस, मूग, तूर हे पीक लावून पाहिले़ परंतु, या पिकामुळे उत्पन्न तर आलेच नाही़ काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ अशा स्थितीत डगमगून न जाता त्यांनी हळदीची लागवड करण्याचा निर्णय घेतला़
पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पीक बहरात आले़ परिसरात असलेल्या निम्न दूधना डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे पीक वाढण्यास मदत झाली, असे त्यांनी सांगितले़ मागील आठ महिन्यांपूर्वी केलेल्या हळदीच्या पिकाच्या प्रयोगामुळे आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झाल्याची माहिती संतोष देशमुख यांनी दिली़
हळदीचे पीक लागवड केल्यानंतर कमी पाण्यावर पीक वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले़ यावेळी जिद्द व मेहनतीच्या बळावर पीक वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले़ पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे बेड पद्धतीद्वारे पीक बहरात आले़ शेतकऱ्यांनी खचून न जाता, आहे त्या परिस्थितीत शेतामध्ये प्रयोग करावेत़
-संतोष देशमुख