- सुमित डोळे
छत्रपती संभाजीनगर : पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूच्या तस्करीसाठी प्रति हायवाला महिन्याकाठी ३० ते ५० हजार रुपये हप्ता बंधनकारक आहे. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी चक्क रस्त्यावर उभा राहून ही ऑनलाईन हप्ता वसुली करत होता. बुधवारी मध्यरात्री १ वाजताचा हा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. पैठण तालुक्यात अशा एकूण ३८ ते ४२ हायवा तर ३० आरीधारकांची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते. शिवाय, आसपासच्या गावांतून रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टर, डंपर, हायवातून वाळूची तस्करी चालते. महसूल, पोलिसांच्या संमतीशिवाय ही वाहतूक अशक्य असल्याचे सांगितले जाते. एका हायवाला दरमहा ३० ते ५० हजार रुपयांच्या हप्त्यानंतर वाहनांना रात्रभर मोकळा रस्ता दिला जातो. जिल्हाभरात राजरोस चालणाऱ्या रॅकेटला पैठण तालुक्यात गोदावरीमुळे विशेष महत्त्व आहे. बुधवारी रात्री १ वाजताचा पिंपळवाडीतील जय स्पिनर फाट्यावरील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याची ‘अर्थपूर्ण’ जबाबदारी असलेला अंमलदार हातात दाेन महागड्या मोबाईलसह कारला निवांत टेकून पैशांविषयी चर्चा करत आहे.
कोड लँग्वेज : वाळूला विटा, हप्त्याला रिचार्जपैठण तालुक्यात वाळू माफिया, पोलिस व महसूलची कोड लँग्वेज आहे. त्यात वाळूला विटा म्हटले जाते तर हप्त्याला रिचार्ज, बांधणी म्हटले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, मोठ्या हायवासाठी ५० ते ८० हजार तर छोट्या हायवासाठी ३० हजारांपर्यंत बांधणी ठरलेली आहे.
पोलिसच पार्टनर ?बुधवारी पकडलेला हायवा जुनेद नामक व्यक्तीचा आहे. जुनेदच्या एकूण ५ हायवा असून, त्यापैकी ३ हायवांमध्ये पैठण पोलिस ठाण्याचा एक अंमलदार पार्टनर आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून तीन हायवांची बांधणी अदा झाली नव्हती. पैठण एमआयडीसीच्या अंमलदाराने बुधवारी रात्री १२:३० वाजता जुनेदचा पिवळ्या रंगाचा भारत बेंझ कंपनीचा हायवा अडवला. पाचही हायवांसाठी पैसे मागितले. हाच पार्टनर असलेला कर्मचारी आरीमध्येही भागीदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाळू व्यावसायिक व अंमलदारामधील संवादवाळू व्यावसायिक : परेशानी है साहाबअंमलदार : नहीं बोलने का ना ! मैं दुसरा जुगाड़ करता नाव्यावसायिक : हा, हमारेच पैसों पर टिका हुआ है तूअंमलदार : दोनों क्लिअर करो अभी, ये भी रिचार्ज क्लिअर करोव्यावसायिक : कौन सा?अंमलदार : ये रनिंग का भी (समोरचा हायवा)अंमलदारासोबतची व्यक्ती : डाल दो, लाख भर अमाऊंट डाल दो उसमेंव्यावसायिक : हा, पाँच-एक लाख डालता ना साहब, लाख भर क्यों?सोबतची व्यक्ती : पाँच लाख कायकु दे रहा?अंमलदार : विटा वाल्याला महिन्याला (हायवांचा कर्कष आवाज) आहे फक्तं, तरी दुखतं त्यांचंव्यावसायिक : अभी तक २० हो गए, बाकी २० नहीं हो रहे हैअंमलदार : बाेले तो?व्यावसायिक : ऑनलाइन की लिमिट खत्म हो गईअंमलदार : फिर अब?व्यावसायिक : लिमिट आने के बाद मारताअंमलदार : कैश दे फिरवाळू व्यावसायिक : कैश नहीं है आज, पुरे अकाऊंट पेचअंमलदार : सुबह दे देना
दोन महिन्यांपूर्वी कारवाई, तरीही३ मार्च रोजी पैठणचे तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण व सलील करीम शेख (रा. लक्ष्मीनगर, पैठण) हे वाळू तस्करांकडून १ लाख २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले होते. तरीही पैठणमधील वाळूचे अर्थचक्र बेलगामपणे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.