कपभर चहाचा देखणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:27+5:302020-12-17T04:29:27+5:30
युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु चहाचे उत्पादन आणि खप सर्वाधिक ...

कपभर चहाचा देखणा प्रवास
युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु चहाचे उत्पादन आणि खप सर्वाधिक असणाऱ्या भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनशिया, बांगलादेश, केनिया, मलेशिया, युगांडा, टान्झानिया, मालवी या देशांमध्ये, तसेच नेदरलँड, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. चहा उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले जावे आणि चहाला योग्य भाव मिळून त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, या उद्देशाने चहा दिवस साजरा केला जातो.
औरंगाबाद शहरात आजघडीला २५० च्या आसपास चहाच्या टपऱ्या असून, जवळपास प्रत्येक हॉटेलमध्येच चहा मिळतो. फक्त चहाच्या टपऱ्यांमध्ये होणारी मासिक आर्थिक उलाढाल ही काही लाखांच्या घरात आहे. मागील ५ वर्षांत चहा विक्रीचा ट्रेण्डही बदलला असून, आता चहाची चकाचक आऊटलेट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादमध्ये विविध ब्रँडच्या कंपन्यांची १० पेक्षाही अधिक आऊटलेट आहेत.
पूर्वी अत्यंत कमी पैसा गुंतवून चहाची टपरी सुरू केली जायची. आता मात्र चहाच्या आऊटलेटला मोठे ग्लॅमर मिळाले असून, एक आऊटलेट सुरू करण्यासाठी लाखो रुपये गुंतवावे लागतात.
चौकट :
औरंगाबादकर पितात महिन्याला ३० टन चहा
- वाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते.
- कोरोना काळात एकीकडे अद्रक, सुंठ, दालचिनी टाकून चहा पिण्याला खूपच महत्त्व आले होते, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे चहाचे उत्पादन थांबले होते. त्यामुळे मे नंतर चहाचे भाव १०० ते १५० रुपयांनी वाढले. चहामध्ये एवढी विक्रमी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी अशोक रुणवाल यांनी सांगितले.
- मार्चपासून चहाची मागणी जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे.
- चहाच्या विविध प्रकारांमध्ये चॉकलेट फ्लेव्हरच्या चहाला सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल इलायची फ्लेव्हर विकला जातो.
- १५० रुपयांपासून ते ५०० रु. किलोपर्यंतचा चहा औरंगाबादकरांच्या पसंतीस उतरत असल्याचेही रुणवाल यांनी सांगितले.