विविध मागण्यांसाठी अपंगांनी केला ‘चक्का जाम’
By Admin | Updated: July 19, 2014 00:40 IST2014-07-18T23:39:23+5:302014-07-19T00:40:34+5:30
बीड: अपंगासाठी शासनाने विविध योजना सुरू केलेल्या असल्या तरी जाचक अटींमुळे अपंग व विधवा यांची हेळसांड होते़
विविध मागण्यांसाठी अपंगांनी केला ‘चक्का जाम’
बीड: अपंगासाठी शासनाने विविध योजना सुरू केलेल्या असल्या तरी जाचक अटींमुळे अपंग व विधवा यांची हेळसांड होते़ लावण्यात आलेले जाचक नियम व अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने शुक्रवारी शहरातील शिवाजी चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले़ एक तास आंदोलन चालल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती़
यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा, परित्यक्ता व अपंगांची प्रकरणे मंजूर करण्यासाठी जे नियम व अटी आहेत त्या अत्यंत जाचक आहेत़ ज्या अपंगाचे नाव दारिद्र्य रेषेखाली नाही त्या अपंगाला तहसीलदार एकवीस हजार रूपयाच्या उत्पन्नाचे पमाणपत्र देत नाहीत़ प्रत्येक अपंग हा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो काम करू शकत नाही़ हे लक्षात घेता प्रत्येक अपंगाचा दारिद्रय रेषेत समावेश केला पाहिजे़ तसेच प्रत्येक अपंगांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा़ अनेक गावांमध्ये जे अपंग आहेत व त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे़ त्यांना देखील शासनाच्या जाचक अटींमुळे घरकुल मिळालेले नाही़ ही वस्तुस्थिती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अपंगाना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून दोन हजार रूपये करण्यात यावे़
तसेच येथील समाज कल्याण कार्यालयातून अपंगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एक ते दीड महिना हेलपाटे मारावे लागतात़ व बीज भांडवल कर्ज योजनेचे बँकांना टार्गेट वाढवून द्यावे आदी मागण्या अपंगांनी केल्या आहेत़
मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे़
संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शेख आलमभाई, उपाध्यक्ष आनंदराव गायकवाड, जिल्हा सचिव शेख जलानी, मार्गदर्शक डॉ़ संतोष मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़
शहरातील शिवाजी चौक येथे रास्ता रोको केल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर शहरात एक तास वाहतूक ठप्प झाली होती़ कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने शहर दणाणले होते़ (प्रतिनिधी)
बेकायदा अतिक्रमण हटविण्याची मागणी
बीड: वैयक्तिक जमिनीवर गावातील काही लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ शेतीवर केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले़
पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील बाळू नाथा सोनवणे यांच्या मालकीची जमीन गट क्ऱ १६३ वर गावातील काही धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण केले आहे़ हे अतिक्रमण मागील अनेक महिन्यापासून केलेले आहे़ याबाबत पाटोदा तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलेले असताना देखील आता पर्यंत काहीच कारवाई झालेली नाही़ गट क्ऱ १६३ मध्ये काही जणांनी जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी लावून जमीन बळकवण्याचा प्रयत्न करित आहेत़ जमीनीवर अतिक्रमण केलेले असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे बाळू नाथा सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ याप्रसंगी संघटनेचे शाखाध्यक्ष बाळू सोनवणे, उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव प्रशांत सोनवणे, सुनील तुपे, अमोल मिसाळ, अनिकेत सोनवणे, रवींद्र सोनवणे, गोकुळ ससाणे, सूर्यकांत तुपे, सुनिल सोनवणे, शिध्दार्थ सोनवणे, गणेश सोनवणे, महेश तुपे आदींची उपस्थिती होती़