नवीन पीक कर्जासाठी बँकांकडून हात आखडता
By Admin | Updated: August 7, 2014 01:54 IST2014-08-07T01:42:25+5:302014-08-07T01:54:57+5:30
बालाजी आडसूळ , कळंब जिल्हा बँकेच्या शाखा वगळता तालुक्यातील १३ बँक शाखांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी ४०६४ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयाच्या पीककर्जाचे वाटप केले आहे.

नवीन पीक कर्जासाठी बँकांकडून हात आखडता
बालाजी आडसूळ , कळंब
जिल्हा बँकेच्या शाखा वगळता तालुक्यातील १३ बँक शाखांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी ४०६४ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयाच्या पीककर्जाचे वाटप केले आहे. परंतु, जुलै अखेर केलेल्या कर्ज वाटपामध्ये ३ हजार ३३६ शेतकरी जुनेच असून, केवळ ७२८ नवीन शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. यातही काही शाखा नवीन कर्जवाटपासाठी वेळकाढूपणा करीत आहेत.
दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज घेण्यासाठी धावपळ दिसून येते. कळंब तालुक्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२ शाखा आहेत. याशिवाय तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ शाखा असून, यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाची कळंब, येरमाळा, मंगरुळ येथे स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या कळंब व आंदोरा येथे तर बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियाची कळंब येथे शाखा आहे. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब, खामसवाडी, मोहा, शिराढोण, मस्सा (खं) येथे पाच शाखा तर खाजगी व्यावसायिक बँक आयसीआयसीआयची कळंब येथे एक शाखा आहे. उपरोक्त सर्व शाखांना ठराविक प्रमाणात रिझर्व्ह बँक व शासनाच्या धोरणानुसार पीककर्ज देणे बंधनकारक आहे.
जिल्हा बँक अडचणीत असल्याने गत चार वर्षापासून या बँकेत नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येत नाही. यामुळे जुन्या कर्जदार सभासदाचे कर्र्ज भरणा करुन घेवून त्यांनाच नवीन वाटप करण्यावर या बँक शाखेचा भर दिसून येत आहे. तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये कळंबच्या बँक आॅफ इंडियाने नवीन शाखा असतानाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देत तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोहा, खामसवाडी येथील शाखेत नवीन कर्ज वाटपाच्या बाबतीत हात आखडला असून, शेतकरी, कर्मचाऱ्यांकडे मनधरणी करुन बेजार झाले आहेत.