धोकादायक खोल्यांवर हातोडा
By Admin | Updated: December 9, 2015 23:50 IST2015-12-09T23:37:48+5:302015-12-09T23:50:18+5:30
जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

धोकादायक खोल्यांवर हातोडा
जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यार् खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे जिकिरीचे बनले होते. अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. या खोल्या जमीनदोस्त करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या मूलभूत सुविधा व ज्ञानार्जन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. धोकदायक वर्गखोल्या, संरक्षक भिंतीची दुरवस्था, बसण्यासाठी जागा नाही, पिण्याचे पाणी नाही यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. धोकादायक वर्गखोल्या पाडाव्यात यासाठी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती. पावसाळ्यात तर या खोल्यांमध्ये जाण्याचीही भीती वाटते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने भिंतीला तडे जाणे, पत्रे फुटणे आदी तांत्रिक मुद्यांचा अभ्यास करत २२४ वर्गखोल्या पाडण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केला.
अंबड तालुक्यातील आठ गावांमधील १५ वर्गखोल्या पाडण्यात येणार आहेत.
मंठा तालुक्यातील १६,परतूर तालुक्यातील ६, घनसावंगी तालुक्यातील २४, भोकरदन तालुक्यातील ८३,जाफराबाद तालुक्यातील ३२, जालना तालुक्यातील २८ तर बदनापूर तालुक्यातील २० वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार
आहेत.
यासंदर्भात जि.प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर म्हणाले, धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खोल्या पाडल्यानंतर निधी उपलब्ध करून नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या वर्ग खोल्या पाडण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे सुसर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भोकरदन तालुक्यातील ३० गावांतील ८३ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. वालसावंगीसह अनेक गावातील ग्रामस्थांनी वर्गखोल्यांचे नूतनीकरण अथवा नव्याने बांधकाम करण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. अखेर जि.प. प्रशासनाने दखल घेत हा निर्णय घेतला आहे.
भिंतीला तडे जाणे,पत्रे फुटणे तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागने तांत्रिक अहवाल शिक्षण विभागास सादर केला आहे. वर्ग खोल्या पाडल्यानंतर साहित्याची नोंद ग्रामपंचात रजिस्टरला घ्यावी,उपयोगी साहित्याचा पूर्ण वापर करावा तसेच निरूपयोगी साहित्याची शासन नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येणार आहे.