अर्ध्यावरती डाव मोडला....
By Admin | Updated: June 4, 2014 01:29 IST2014-06-04T00:34:36+5:302014-06-04T01:29:45+5:30
बीड : सुखाचे दिवस कधी त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत़ गोपीनाथराव मुंडे आणि विरोधी बाकातील खुर्ची़़़़ हे ठरलेले नाते़

अर्ध्यावरती डाव मोडला....
बीड : सुखाचे दिवस कधी त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत़ गोपीनाथराव मुंडे आणि विरोधी बाकातील खुर्ची़़़़ हे ठरलेले नाते़ युतीच्या काळातील साडेचार वर्ष वगळल्यास ते कायम सत्तेबाहेर राहिले़ गेल्या आठवड्यात मुंडे यांची केंद्रात कॅबिनेटमंत्री म्हणून वर्णी लागली़ डाव आता कुठे रंगात आला होता; पण मंत्रिपद मिळाल्यावर दहाव्या दिवशीच मुंडे यांनी निरोप घेतला़ गोपीनाथराव मुंडे म्हटले की, आठवतो एक रुबाबदार व स्वाभिमानी चेहरा़ संघर्षाचा प्रवास करुन सत्तेतील उच्चस्थानापर्यंत भरारी घेणारा नेता़ भाजपाला वाड्या, वस्त्या, तांड्यावर नेऊन पोहोचविण्याचे काम त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थतीत केले़ ते जणू राज्यातील भाजपाचा चेहराच बनले होते़ जि़प़ सदस्य ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री ही उत्तुंग भरारी काही पाच- दहा वर्षात झाली नाही़ या प्रवासात मुंडे यांना पदोपदी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला़ आणीबाणीच्या आंदोलनातून मुंडेंचे नेतृत्व खर्या अर्थाने बहरले़ ज्या भाजपाची जिल्ह्याला ओळख नव्हती त्या भाजपाला घराघरात अन् मनामनात पोहोचविण्याचे काम मुंडे यांनी प्रामाणिकपणे केले़ त्यांनी कधीही फळाची लालसा ठेवली नाही, त्यामुळेच न मागता त्यांना सर्वकाही मिळत गेले़ १९७८ मध्ये गोपीनाथराव मुंडे हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत निवडून गेले़ त्यानंतर १९८० मध्ये रेणापूर मतदारसंघातून ते प्रथमच आमदार झाले़ दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही आले़ १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आली़ यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली़ ज्या प्रमोद महाजनांच्या सोबतीने ते राजकारणात आले त्या महाजन यांचे अकाली निधन झाले़ त्यामुळे मुंडे एकाकी पडले़ महाजनांनंतर मुंडे संपले़़ असे सांगितले जात होते; परंतु मुंडे या धक्क्यातूनही बाहेर आले़ त्यानंतर आप्तस्वकियांनी गोपीनाथराव मुंंडे यांच्यापुढील अडचणी वाढविल्या़ ज्यांना मुंडेंनी गुलाल लावला तेच मुंडेंपासून वेगळे झाले़ यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तर गोपीनाथराव मुंडे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीकेची अक्षरश: झोड उठविण्यात आली़ मात्र, या टीकांना भीक न घालता मुंडे यांनी विरोधकांचे वार परतवून लावले़ मुंडे मोठ्या मताधिक्याने दुसर्यांदा लोकसभेत निवडून गेले़ नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले़ केंद्रातील सत्तेत बीडला मुंडेंच्या रुपाने मोठा वाटा मिळाला़ २६ मे रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली़ मंत्री झाल्यापासून ते अतिशय आनंदी होते़ मंत्रिमंडळ बैठक, भेटीगाठी यामध्ये ते नऊ दिवस व्यस्त होते़ मंगळवारी सकाळी ते बीडला जाण्यासाठी निघाले; पण काळाने आघात केला़ मुंडेंचे स्वप्न अधुरे राहिले गोपीनाथराव मुंडे मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मंगळवारी बीडला येत होते़ मात्र, काळाने मुंडेंना सर्वांपासून हिरावून नेले़ त्यांच्या स्वागतसाठी आणलेली फुले श्रद्धांजलीसाठी वापरण्याचा दुर्दैवी प्रसंग कार्यकर्त्यांवर आला़ आयुष्यभर ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला ते मुंडे आता मंत्री झाल्याने सर्वांनाच त्यांचे कौतूक वाटत होते़ दु:खाचे दिवस संपले आता सुखाचे पर्व सुरु झाले असे वाटत असतानाच मंत्रिपद भेटल्यावर अवघ्या दहाव्या दिवशी ते सत्तेचा भरला संसार सोडून गेले़ त्यामुळे त्यांनी पाहिलेले सामान्य माणसाच्या हिताचे व ग्रामोन्नतीचे स्वप्न अधुरेच राहिले़ (प्रतिनिधी) सुरुवात अन् शेवट भाजपातच ... गोपीनाथराव मुंडे यांनी आपला संघर्षमय प्रवास कधी थांबविला नाही की कधी त्यांनी तत्वांशी तडजोड देखील केली नाही़ त्यांनी राजकारणाची सुरुवात भाजपातच केली अन् शेवटचा श्वासही भाजपातच घेतला़ एकीकडे सत्ता अन् दुसरीकडे पक्ष असे दोन पर्याय होते; परंतु मुंडे यांनी सत्तेपेक्षा विचारांना प्राधान्य दिले़ त्यामुळे पक्षातही त्यांची ‘इमेज’ कायम होती़