अर्धी उत्तरपत्रिका तपासलीच नाही
By Admin | Updated: June 5, 2014 01:08 IST2014-06-05T01:00:16+5:302014-06-05T01:08:21+5:30
औरंगाबाद : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गप्पा मारणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातील गोंधळ रोज नव्याने समोर येत आहे.

अर्धी उत्तरपत्रिका तपासलीच नाही
औरंगाबाद : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गप्पा मारणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातील गोंधळ रोज नव्याने समोर येत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या एका विषयाची अर्धीच उत्तरपत्रिका तपासून त्याला गुण देण्यात आल्यामुळे तो नापास झाला आहे. विद्यापीठाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिके च्या झेरॉक्सप्रतीनंतर हा प्रकार उघडकीस आला. ओव्हर जटवाडा येथील एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज येथे सय्यद इद्रीस अहेमद हा विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत आहे. त्याने आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला. त्याने टूल इंजिनिअरिंग या पेपरमधील प्रश्न क्रमांक ७ सोडविला. त्यासाठी त्याने उत्तरपत्रिकेला स्वतंत्र पुरवणी जोडली. १८ गुणांच्या या प्रश्नाकडे पेपर तपासणी करणार्या प्राध्यापकाने बघितलेच नाही. त्याचे इतर प्रश्न तपासून त्यांना गुण देतानाही चुका करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. उत्तरपत्रिका अर्धवट तपासल्याचे त्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा प्राचार्यांनी विद्यापीठाच्या नावाने पत्र देऊन झालेली चूक दुरुस्त करून विद्यार्थ्यास गुण द्यावे, असे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत न लिहिलेल्या प्रश्नाच्या उत्तराला गुण देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. जुन्या अभ्यासक्रमाच्या या विद्यार्थ्याचे विद्यापीठाच्या चुकीमुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही चूक दुरुस्त करून विद्यापीठाने आपली संपूर्ण उत्तरपत्रिका तपासावी आणि गुण द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन घेऊन तो चार दिवसांपासून परीक्षा विभागात खेटे घालत आहेत. मात्र, चक्क परीक्षा नियंत्रकापासून ते तेथील खिडकीवरील कर्मचार्यांपर्यंत सर्वांनी त्यास मदत करण्यास नकार दिला आहे. माझे उत्तर तपासले असते आणि ते चूक असल्यामुळे मला कमी गुण प्रदान केले असते, तरी मला काहीही वाटले नसते. मात्र, उत्तरपत्रिका तपासणार्यांनी १८ गुणांचा प्रश्न तपासलाच नाही. परिणामी, मला कमी गुण मिळाल्याने मी नापास झालो. यामुळे माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांवर विद्यापीठ अन्याय करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विद्यापीठाने माझी उत्तरपत्रिका पुन्हा तपासावी. - सय्यद इद्रीस, विद्यार्थी