हिमायतनगर तालुक्यात सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:53 IST2017-07-26T00:52:05+5:302017-07-26T00:53:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिमायतनगर: नक्षलवाद्यांचा २६ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान शहीद सप्ताह असून त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील सर्व पोलीस ...

हिमायतनगर तालुक्यात सतर्कतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिमायतनगर: नक्षलवाद्यांचा २६ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान शहीद सप्ताह असून त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ या काळात नक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु गेल्या काही वर्षांत नक्षली कारवाया नसल्यात जमा आहेत़
पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या नक्षल्यांच्या समर्थनार्थ नक्षलवादी दरवर्षी या काळात नक्षल शहीद सप्ताह पाळतात़ या काळात युवा पिढीला नक्षल संघटनेत सामावून घेण्यासाठी त्यांच्याकडून अधिक प्रयत्न करण्यात येतात़
हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा राज्य सीमेवरील म्हैसा, निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, करिमनगर, संगारेड्डी तर महाराष्ट्रातील किनवट, माहूर, मांडवी, विदर्भातील उमरखेड, यवतमाळ, पांढरकवडा, महागाव, दारव्हा, दिग्रस आदी भागांत २० वर्षांपूर्वी नक्षलवादी सक्रिय होत, परंतु आंध्रा आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही चळवळ मोडीत काढली़
त्यात गेल्या अनेक वर्षांत कोणतीही मोठी घटना घडली नाही, परंतु दरवर्षी या काळात सतर्कतेच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येते़ त्या दृष्टीने सर्व पोलीस ठाण्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत़