वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरावरील पत्रे उडाले
By Admin | Updated: June 5, 2016 00:36 IST2016-06-05T00:25:50+5:302016-06-05T00:36:04+5:30
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे, विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पाऊस झाला़ शहरानजीक वैराग रोडवरील

वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरावरील पत्रे उडाले
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे, विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पाऊस झाला़ शहरानजीक वैराग रोडवरील एका पोल्ट्रीचे शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने इसमासह ५०० कोंबड्या ठार झाल्या़ तर तालुक्यातील राघूचीवाडी येथे वीज पडल्याने एक म्हैस ठार झाली़ उस्मानाबाद, कळंब, लोहारा, तुळजापूर तालुका व परिसरातही शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून, ग्रामीण भागातील अनेक गावातील शेकडो घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले होते़
उन्हाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे़ उस्मानाबाद शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ या पावसात शहरासह परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली होती़ कळंब तालुक्यातील खोंदला शिवारात वीज पडल्याने बाळू वामन मोटे (वय-४५ रा़ मोटेवाडी ता़माण) या मेंढपाळाचा मृत्यू झाला़ तर नायगाव परिसरात वीज पडल्याने सुब्राव माने, पापा शेख यांच्या प्रत्येकी तीन शेळ्या ठार झाल्या आहेत़ नायगाव- मुरूड मार्गावरील अनेक मोठमोठे वृक्षही उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ वाशी येथील शेतकरी प्रकाश कवडे यांची गाय वीज पडल्याने ठार झाली़ वाशी ते घोडकी मार्गावरील बाभळीच्या झाडांसह इतर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती़ वाशी येथील जितेंद्र भिमराव कुंभार यांच्या पावभट्टीवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले़ तानाजी शिवाजीराव चेडे यांच्या शेतातील घराची भिंतही पडली आहे़ नांदगाव येथील जनावरांची चारा छावणीही उध्वस्त झाली आहे़ जनावरांचा चाराही वाऱ्यामुळे उडून गेला आहे़ वाशी तालुक्यातील बावी येथील पुष्पावती पंडित वरपे (वय-७०) या महिलेच्या डोक्यात पत्रा उडून लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे़ गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात दाखल केले आहे़ तर वाशी तालुक्यातील कवडेवाडी, घोडकी, बावी, इंदापूर, गोजवाडा आदी भागातील अनेक कांदा चाळ या उडून गेल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते़
उस्मानाबाद शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ शहरानजीक वैराग रोडवरील पोल्ट्री वादळी वाऱ्यामुळे कोसळली. यात इलियास महैबुब शेख (वय-५२) या इसमाचा मृत्यू झाला़ तर पोल्ट्रीमधील तब्बल ५०० कोंबड्याही वीज पडल्याने होरपळून ठार झाल्या़ घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़एम़शेख व पोलीस कर्मचारी, महसूलच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़
मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तुळजापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागातही पावसाने हजेरी लावली़ तर काक्रंबा शिवारात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला़ कळंब शहरासह मस्सा खंडेश्वरी व परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ लोहारा, सास्तूर भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या . (प्रतिनिधी)