गुरुजी हमारो आये है नई रोशनी लाये है

By Admin | Updated: June 30, 2014 01:20 IST2014-06-30T01:19:43+5:302014-06-30T01:20:19+5:30

औरंगाबाद : ‘गुरुजी हमारो आये है, नई रोशनी लाये है,’ असा जयघोष करीत सिडकोत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Guruji has brought us new lights | गुरुजी हमारो आये है नई रोशनी लाये है

गुरुजी हमारो आये है नई रोशनी लाये है

औरंगाबाद : ‘गुरुजी हमारो आये है, नई रोशनी लाये है,’ असा जयघोष करीत सिडकोत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. चातुर्मासानिमित्त शेकडो भाविकांच्या साक्षीने जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाने केशरबाग येथे प्रवेश केला. महाराजांच्या आगमनामुळे सकल जैन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभायात्रेत आबालवृद्धांनी सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.
साधू-साध्वीजींच्या उपस्थितीत सिडकोत सकाळी मोठी शोभायात्रा काढण्यात आली. रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाच्या स्वागतासाठी सकल जैन समाज एकवटला होता. याची प्रचीती महावीर जयंतीनंतर पुन्हा एकदा आज आली. सिडको एन-२ परिसरातील आ. सुभाष झांबड
यांच्या निवासस्थानापासून सकाळी ८.१५ वा. शोभायात्रेला सुरुवात झाली.
जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा., पद्मसुंदरसुरीश्वरजी म.सा. आदी साधूवृंद तसेच पुण्यनिधिश्रीजी म.सा. आदी साध्वीवृंदासोबत शेकडो भाविक चालत होते. या शोभायात्रेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, महावीर पाटणी, रवी मुगदिया, सकल जैन समाजाचे भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या अग्रभागी अश्वारूढ झालेल्या बालकांनी हातात धर्मध्वजा घेतली होती. मंगल कलश डोक्यावर घेतलेल्या महिला भजन गात चालत होत्या. त्यापाठीमागे बग्मीमध्ये इंद्र महाराजांची वेशभूषा केलेले युवक बसले होते.
बग्गीमागे धार्मिक वेशभूषा केलेली ५६ मुले चालत होती. एका बग्गीत आचार्य भुवनभानुसुरीश्वरजी म.सा. यांचा फोटो ठेवण्यात आला होता. अन्य दोन बग्गीतही आचार्यांचे फोटो ठेवण्यात आले होते. सजविलेल्या तीन ट्रॅक्टरमध्ये ५६ कुमारिका विराजमान झाल्या होत्या. एका ट्रॅक्टरमध्ये विविध वेशभूषांतील चिमुकल्यांना बसविण्यात आले होते. हे चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. खास शोभायात्रेसाठी राजस्थान राज्यातील विजापूर येथील बँड पथक आणण्यात आले होते. गायक चेतन राठोड विविध धार्मिक गीते सादर करून सर्वांचा उत्साह वाढवीत होते. ९.११ वा. जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. ससंघाने सिडको एन-३ येथील केशरबाग कार्यालयात प्रवेश केला. शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजंूना थांबून नागरिक महाराजांचे दर्शन घेत होते. यानंतर शोभायात्रा जैन मंदिरापासून पुन्हा सुरू झाली.
जालना रोड, एपीआय कॉर्नरमार्गे शोभायात्रा प्रोझोन मॉलच्या बाजूला असलेल्या जुन्या स्पेन्सर हॉल येथे पोहोचली.
शोभायात्रा मार्गावर रांगोळी
चातुर्मासानिमित्त शोभायात्रा मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रा येण्याआधी रांगोळी काढल्याने वातावरण मंगलमय झाले होते.

Web Title: Guruji has brought us new lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.