हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

By Admin | Updated: August 7, 2014 23:30 IST2014-08-07T23:05:02+5:302014-08-07T23:30:44+5:30

हिंगोली : कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.

Guidance on new criteria for water supply schemes in Hingoli | हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

हिंगोलीत पाणीपुरवठा योजनांच्या नव्या निकषांबाबत मार्गदर्शन

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजनांसाठी बदललेल्या निकषांबाबत मार्गदर्शनासाठी हिंगोलीत घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी १२८ गावांच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व सचिवांची उपस्थिती होती.
नव्याने आलेल्या ४ शासन निर्णयांमुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे यावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण कामे होण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, कार्यकारी अभियंता गंगाधर एंबडवार आदींनी मार्गदर्शन केले. शासनाने आता पाणीपुरवठा योजनेसाठी दहा टक्के लोकवर्गणी माफ केली आहे. तसेच लोकसंख्येनुसार दरडोई वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. २00२ पासून २0१३ पर्यंतचे दर रद्द करून नवीन दर लागू केले आहेत. त्यामुळे योजनांची किंमत वाढणार आहे. या शिवाय खर्चाच्या अधिकारामध्येही बदल केला आहे. पूर्वी कार्यकारी अभियंत्यांना ५0 लाखांपर्यंतच्याच कामांना तांत्रिक मान्यता देता येत होती. आता २ कोटींपर्यंत देता येईल. तसेच अधीक्षक अभियंत्यांना ५ ते ७.५ कोटींपर्यंतच्या कामास तर त्यापुढील काम शासनाकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळणार आहे.
कार्यकारी अभियंता एंबडवार यांनी प्रोजेक्टरद्वारे योजनेविषयी माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना पाणी ही प्रत्येकाची मुलभूत गरज असल्याने ही कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे, असे आग्रहपूर्वक पाहण्याचे आवाहन केले.
यावर्षीच्या आराखड्यात ३९ गावांना पाणीपुरवठा मंजूर आहे. त्यामुळे या ग्रामस्थांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहनही केले.
सूत्रसंचालन संघरत्न नरवाडे यांनी केले. तर राजेंद्र सरकटे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Guidance on new criteria for water supply schemes in Hingoli