व्हॉटस् अॅपचा ग्रुप अॅडमिन अटकेत
By Admin | Updated: June 18, 2014 01:39 IST2014-06-18T01:34:19+5:302014-06-18T01:39:19+5:30
औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे

व्हॉटस् अॅपचा ग्रुप अॅडमिन अटकेत
औरंगाबाद : फेसबुक तसेच ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुप तयार करून त्यावर माहिती, मनोरंजन तर अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडिओ पाठविण्याचे तरुणाईमध्ये मोठे फॅड आलेले आहे; पण जो अशा ग्रुपचा म्होरक्या आहे, त्याला भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांची पुसटशीही कल्पना नाही. कायद्याचे तसूभरही ज्ञान नाही. अशा एका ग्रुप अॅडमिनवर आज पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली.
शेख कलीम शेख सिराजोद्दीन (२२, ह.मु. जोगेश्वरी, मूळ रा. मांजरी, ता. गंगापूर), असे अटक करण्यात आलेल्या व्हॉटस् अॅपवरील एका ग्रुप अॅडमिनचे नाव आहे. शेख कलीम हा वाळूज येथील होंडा शोरूममध्ये वसुलीचे काम करतो. तो एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. शेख सिराजोद्दीन यांच्या नावाचे कलीमकडे सीम कार्ड आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर व्हॉटस् अॅपचा एक ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये त्याच्या फेसबुक अकाऊंटमधील मित्रांना परस्पर सदस्य बनवले. विशेष म्हणजे, फेसबुकवरही त्याच्या बहुतांश अनोळखी मित्रांचा भरणाच अधिक आहे.
परवा रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिनेश अशोक बियाणी (रा. चुनाभट्टी, गांधीनगर) हा घराबाहेर अमन राऊत या आपल्या मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी अमन राऊतच्या ‘व्हॉटस् अॅप’वर एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. त्यात एका देवाचे विडंबनात्मक चित्र होते. ते अमन राऊत याने दिनेश बियाणी यास दाखवले. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते आपल्या काही मित्रांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले व तेथे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ते चित्र राजस्थानमधून टाकले गेले
गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरील ग्रुप अॅडमिनचा शोध घेतला असता तो जोगेश्वरी येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शेख कलीम यास अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता व्हॉटस् अॅपवर ते चित्र राजस्थान येथील रोमिओ आसेफ या तरुणाने ग्रुपमध्ये टाकल्याचे त्याने सांगितले.
रोमिओ हा शेख कलीमचा फेसबुक मित्र आहे. कलीम त्याला प्रत्यक्ष कधी भेटलाही नाही व त्याच्याशी कधी बोललादेखील नाही, हे विशेष! या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत.