परभणी जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना

By Admin | Updated: June 4, 2014 00:44 IST2014-06-04T00:37:35+5:302014-06-04T00:44:30+5:30

परभणी : मराठवाड्याचे सुपुत्र तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त झाल्या.

The grieving expressed by the dignitaries of Parbhani district | परभणी जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना

परभणी जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना

 परभणी : मराठवाड्याचे सुपुत्र तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त झाल्या. त्यातील काही निवडक अशा. मराठवाड्याचे छत्र हरपले- आ.बोर्डीकर गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षात असतानाही राजकारणात त्यांचाशी वडील भावासारखा संबंध राहिला. वैयक्तिक बोर्डीकर कुटुंबाचे पांघरुण निघून गेले असून, मराठवाड्याच्या विकासाची कास धरणारा नेता आपल्यातून निघून गेला, हे न भरुन निघणारे नुकसान असून मराठवाड्याचे छत्र हरवल्याची प्रतिक्रिया आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिली. काळाने घाला घातला -सुरेश देशमुख गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे आता मराठवाड्याचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वास वाटत होता. परंतु, काळाने मध्येच मुंडे यांच्यावर घाला घातल्याने जनतेचे स्वप्न भंगले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस (आय) चे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी व्यक्त केली. बहुजनाचा नेता हरपला - भांबळे गोपीनाथराव मुंडे यांनी बहुजनाचे नेतृत्व केले. बहुजन समाजाला खर्‍या अर्थाने न्याय देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुुंबियांना जे दु:ख झाले, त्यामध्ये आम्ही सहभागी असल्याची प्रतिक्रिया राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी दिली. सहकारी हरपला : माजी खा.दुधगावकर मराठवाडा विकास आंदोलनात गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासमवेत आपणही सहभाग घेतला होता. गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनामुळे मराठवाड्यात पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी खा. गणेशराव दुधगावकर यांनी दिली. शब्द पाळणारा नेता - विजय गव्हाणे मराठवाड्याच्या मातीवर मनस्वी प्रेम करणारा आणि दिलेला शब्द पाळणारा बहुजनांचा नेता आपल्यातून कायमचा हरपल्याने अतिव दु:ख झाले, अशी शोक भावना भाजपाचे नेते अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी व्यक्त केली. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री या रुपाने मुंडे साहेबांना राज्याचा विकास करण्याची मोठी संधी मिळाली होती. परंतु, दुर्देवाने काळाने ही संधी हिरावून नेल्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला, असेही ते म्हणाले. हरहुन्नरी नेतृत्व हरपले - लहाने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले आणि स्वत:च्या कर्तृत्वाने ठसा उमटविणारे गोपीनाथराव मुंडे हे अचानक निघून गेल्याने महाराष्टÑाचे हरहुन्नरी नेतृत्व हरवल्याची प्रतिक्रिया माजी आ. हरिभाऊ लहाने यांनी व्यक्त केली. सर्वात मोठी दु:खद घटना- डॉ.केंद्रे गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे आमच्या परिवाराला सर्वात मोठे दु:ख झाले. दु:खाचा असा डोंगर आमच्यावर कधीही कोसळला नव्हता. सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून सोडविणार्‍या गोपीनाथराव मुंडे यांच्यावर नियतीने घाला घातला, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी दु:खद घटना आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी दिली. लोकनेता हरपला- विठ्ठल रबदडे केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे हे महाराष्टÑातील गोरगरीब जनतेचे कष्टकरी शेतकर्‍यांचे, ऊसतोड कामगारांचे प्राण होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा झुंजार लोकनेता हरपला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांनी व्यक्त केली. मराठवाड्याचे छत्र हरपले- पाटील गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने महाराष्टÑातील शेतकरी, कष्टकरी व उमदा तरूणवर्ग याची अपरिमित हानी झाली. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचे छत्र हरपल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. पी. डी. पाटील यांंनी दिली. भाजपाला मोठा धक्का- मुंडे गोपीनाथराव मुंडे यांनी कष्टातून भाजपाचा वटवृक्ष निर्माण केला. गोरगरिबांशी थेट भिडलेला हा नेता आमच्यातून निघून गेला. यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. सर्वसामान्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला, अशी प्रतिक्रिया भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर मुंडे यांनी व्यक्त केली. गोरगरिबांचा आधार गेला- भालेराव गोपीनाथराव मुंडे यांना नियतीने हिरावून नेले. यामुळे महाराष्टÑातील गोरगरीब जनतेचा आधार गेला. मराठवाड्यातील प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्यात राहिला नाही, याचे मोठे दु:ख होते, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे अ‍ॅड. गौतम भालेराव यांनी व्यक्त केली. खरा नेता हरवला- अनिल मुद्गलकर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओळखणारा खरा नेता हरपला असून यामुळे भारतीय जनता पक्षाचे पर्यायाने महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुद्गलकर यांनी नमूद केली. लढाऊ योद्धा गेला- विजय वाकोडे बहुजनांचा आधारस्तंभ व लढाऊ योद्धा आमच्यातून गेल्याने बहुजन समाज पोरका झाल्याची भावना भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल भीमशक्तीच्या वतीने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंडे यांच्या निधनामुळे भीमशक्तीने जिल्ह्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यावेळी सिद्धार्थ कसारे, अरुण लहाने, परमेश्वर कांबळे, सतीश भिसे, किरण घोंगडे, सचिन डुमणे, सुभाष वाव्हळे, तातेराव वाकळे, भारत खंदारे, सतीश कोटे, आकाश मुंडे, एस. टी. गायकवाड, खमर फुलारी, द्वारकाबाई गंडले आदी उपस्थित होते. अनाथांचा नाथ गेला- धोंडगे मराठवाड्याची शान व शेतकर्‍यांचे कैवारी असलेले गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे अनाथांचा नाथ गेल्याची भावना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी व्यक्त केली. कष्टकर्‍यांचा कैवारी - बालाजी मुंडे मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता या जगातून निघून गेल्याने शेतकरीही हवालदिल झाला असून सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, ओबीसी समाजाचा आधार गेला, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी दिली. ओबीसीचे दैवत गेले- बंडगर मराठवाड्यातील ओबीसीचे दैवत गोपीनाथराव मुंडे या जगातून निघून गेल्याने ओबीसी समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला, अशी प्रतिक्रिया राष्टÑीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बंडगर यांनी दिली. बहुजनांचा नेता हरपला- दाभाडे शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्टÑात बहुजनांचे हित जोपासणारा नेता म्हणून एकमेव गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु काळाने घाला घातल्याने बहुजनांचा हा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया रिपाइं ए चे राज्य सचिव डी. एन. दाभाडे यांनी दिली. ओबीसीचा नेता गेला- विष्णू कुटे राज्यात ओबीसी प्रवर्गाच्या न्याय्य हक्कासाठी झटणारा नेता, हरपल्याची भावना कोष्टी समाजाचे विष्णू कुटे यांनी व्यक्त केली.गोपीनाथराव मुंडे हे कोष्टी समाजाचे खंदे समर्थक होते. त्यांच्या निधनामुळे समाजाचा पालक हरवला, असेही ते म्हणाले. संघर्षपर्व संपले - अभय चाटे गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने महाराष्टÑातील संघर्षपर्व संपले. सर्वसामान्यांचा आधास्तंभ, महाराष्टÑातील तळागाळातील नागरिकांचा आधार, लोकनेता आता पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अभय चाटे यांनी व्यक्त केली. संघर्षशील नेता हरपला- भाई मुंडे सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन सतत संघर्ष करीत केंद्रीय मंत्री पदापर्यंत गोपीनाथराव मुंडे यांनी मजल मारली. सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे हे एकमेव नेते होते. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे संघर्ष करणारा नेता हरपल्याची प्रतिक्रिया भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी व्यक्त केली. मराठवाड्याचे नुकसान : रोकडे गोपीनाथराव मुंडे यांचे निधन ही धक्का देणारी घटना असून, यामुळे भाजपा व मराठवाड्याचे प्रचंड नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया जि.प. सभापती गणेशराव रोकडे यांनी व्यक्त केली आहे. काळा मंगळवार- अ‍ॅड.सोनी गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे आजचा दिवस मराठवाड्यासाठी काळा मंगळवार असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. अशोक सोनी यांनी व्यक्त केली. मागास भागाच्या विकासाची जाण व जननेतृत्व करण्याची क्षमता असणारा एवढा वजनदार नेता यापुढे होणे नाही, असेही अ‍ॅड. सोनी यांनी नमूद केले.

Web Title: The grieving expressed by the dignitaries of Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.