राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:05 PM2022-04-28T12:05:47+5:302022-04-28T13:42:13+5:30

पोलीस उपायुक्तांनी मैदानाची पाहणी केली असून आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार निर्णय

Green signal for Raj Thackeray's meeting will be decided today in Police meeting | राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय

राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय

googlenewsNext

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवागनी देण्याचा निर्णय शहर पोलीस गुरुवारी घेणार असल्याची असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तत्पूर्वी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची पाहणी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने शहरात जोरदार तयारी सुरु केली आहे. 

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांकडून परवानगी मिळणार की नाही, याविषयी चर्चा आहे. मनसेतर्फे सभेची तयारी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदींच्या समोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मनसेची शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे. 

३ मे रोजी रमजान ईदसह इतर धर्मीयांचे सण आहेत. त्यामुळे शहरातील सामाजिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी पोलीस काळजीपूर्वक पावले उचलत आहेत. मनसेच्या सभेला पोलिसांकडून परवानगी मिळण्यासाठी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय आयुक्तांनी घेतलेला नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही परवानगीचा निर्णय आयुक्त घेतील, असे स्पष्ट केले आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेत परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

ग्राऊंड रिपोर्ट पाहून निर्णय
शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी होणार आहे. या बैठकीत प्रत्यक्ष ग्राऊंड रिपोर्ट घेण्यात येतील. त्यानंतर मनसेच्या सभेला परवानगी देण्याबाबत निर्णय होईल.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

Web Title: Green signal for Raj Thackeray's meeting will be decided today in Police meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.