‘हिरवं स्वप्न’ केवळ कागदावर
By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-28T00:00:44+5:302014-07-28T00:57:36+5:30
कळंब : पर्यावरणाचा समतोल ढासाळण्यास वृक्षतोड कारणीभूत असल्याचे वारंवार सांगण्यात येते़
‘हिरवं स्वप्न’ केवळ कागदावर
कळंब : पर्यावरणाचा समतोल ढासाळण्यास वृक्षतोड कारणीभूत असल्याचे वारंवार सांगण्यात येते़ त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘हिरवं स्वप्न’ रंगवत वनविभागाकडून शतकोटी वृक्षलागवड करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला़ वर्षानुवर्षे वृक्षलागवड होत असली तरी वृक्षारोपनासाठी मात्र, आवश्यक ती यंत्रणा नसल्याने ‘हिरवं स्वप्न’ केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे़
कळंब तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वृक्षांचे असलेले प्रमाण नगण्य आहे़ सामाजिक वनीकरणाची संरक्षित वनक्षेत्र खासगी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत़ दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वृक्ष विकून प्रपंच भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ त्यातच गावोगावी वाढलेल्या खव्यांच्या भट्ट्यांसह इतर कारखान्यांमुळे वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात सुरू आहे़
शासनाने २०११ मध्ये वृक्षलागवडी योजना राबविण्याचा निर्णय घेतला़ ग्लोबल वॉर्मिंगच्या फटक्यास तोंड देणारी परिस्थिती निर्माण व्हावी, गावे हरित व्हावीत यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावरून ग्रामपातळीवर लक्षांक देण्यात येतो़ त्यामुळे कागदावर शतकोटी वृक्षलागवड केी जाते़ मात्र, त्यातील किती झाडे जगली किंवा ती झाडे जगविण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ त्याकडे प्रशासनस्तरासह सर्वसामान्यांतूनही दुर्लक्षही करण्यात येत आहे़ (वार्ताहर)
जबाबदारी कोणाची
शासनाकडून नाविन्यपूर्ण योजना राबविली जाते, चांगला उपक्रम हाती घेतला जातो़ परंतु अंमलबजावणीतील त्रुटी, जबाबदारीचे दायित्व निश्चित केले जात नाही़ त्यामुळे चांगल्या योजनांचाही बोऱ्या उडत आहे़ शतकोटी वृक्षलागवड योजनेच्या बाबतीतही नेमके असेच घडत आहे़ शाळा, महाविद्यालयासह शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येते़ मात्र, काही शाळा, महाविद्यालयांचा अपवाद वगळला तर त्याच्या संवर्धनाकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही़ ग्रामपंचायत स्तरावर तर परिस्थिती खूपच बिकट आहे़
यंदा पुन्हा नवे उद्दिष्ट
तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी यावर्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेतून जवळपास एक लाख २ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ याबाबतचे कामकाज सुरू आहे़ गत दोन तीन-वर्षाचा अनुभव पाहता, ही झाडे जगत नसतील तर नवीन उद्दिष्ट कशासाठी असा प्रश्न समोर येत आहे़ शतकोटी वृक्षलागवडीनंतरचे पालकत्व, जबाबदारी निश्चित का केली जात नाही ? झाडे जगू का शकत नाहीत ? याचे सोशल आॅडिट का होत नाही ? वृक्षलागवडीचा हा ‘वग’ वर्षानुवर्षे असाच चालवला जाणार काय ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत़ खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकठिकाणी वृक्षलागवड केली मात्र, ती झाडे जगली का जळाली याकडे लक्ष कोणीच देत नाही़ त्यामुळे दरवर्षी जुन्याच खड्ड्यात वृक्षारोपण करून काय उपयोग? ‘हिरवं स्वप्न’ कधी सत्यात उतरणार ? याचे उत्तर मात्र, कोणाकडेच नाही़
९० हजार रोपे लावली
कळंब तालुक्यात गतवर्षी पंचायत समिती स्तरावर ९० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून देण्यात आले होते़ पंचायत समितीस्तरावर गावनिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला ़त्यातून तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ यानुसार १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करीत ९० हजार रोपांची लागवड करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते़ मात्र, यातील वस्तुस्थिती काय आणि किती रोपे लावली याची आकडेवारी मात्र, संशयाच्या भोवऱ्यात आहे़