शेतजमिनी नसतानाही लाटले गारपिटीचे अनुदान
By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-09T00:07:24+5:302014-08-09T00:29:05+5:30
लक्ष्मण दुधाटे पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील काही लोकांनी शेतजमिनी नसतानाही अनुदान लाटले आहे.

शेतजमिनी नसतानाही लाटले गारपिटीचे अनुदान
लक्ष्मण दुधाटे पालम
तालुक्यातील पोखर्णी देवी येथील काही लोकांनी शेतजमिनी नसतानाही अनुदान लाटले आहे. तलाठी व कृषी सहाय्यकांनी गोरगरिब शेतकऱ्यांना वंचित ठेवत जमिनी नसणाऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश केला आहे. यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पं. स. सदस्य नामदेव कदम यांनी केली आहे.
पालम तालुक्यात २८ फेब्रुवारी ते १२ मार्च या दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. या गारपिटीत शेतामधील उभी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले होते.
तालुक्यातील पोखर्णी देवी येथे तलाठी महाले, कृषीसहाय्यक होळगीर यांच्या पथकाने पिकांचे पंचनामे करून अनुदानासाठी यादी तयार केली होती. शेतकऱ्यांकडून पैसे उकळून या कर्मचाऱ्यांंनी अनुदानाच्या यादीत मोठ्या प्रमाणात खाडाखोड केल्याचा धक्कादायक प्रकार अनुदान वाटपाच्या वेळी ग्रामस्थांच्या लक्षात आला.
नावामधील ३० ते ३५ लोकांच्या नावाने जमिनी नसतानाही हजारो रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. परंतु खऱ्या गोरगरिब शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून चक्क वंचित ठेवण्यात आले आहे. यादी क्रमांक २५ मध्ये गट नं. ५७ दाखविण्यात आला आहे. परंतु संबंधितांच्या नावे या गटात जमीनच नाही. तसेच यादी क्रमांक १०० मध्ये सर्वे नं. १४८ दाखविण्यात आला असून अनुदान येणाऱ्यांच्या नावे जमीन नाही. तसेच यादी क्रमांक ९२ मध्ये सर्वे नं. १३१ आहे परंतु या सर्वे नंबरमधील जमीन पडीक असून जनावरांचा गोटा व शौचालय, उकिरडा असताना पीक दाखवून अनुदान देण्यात आले आहे. एकाच व्यक्तीला दोन-दोन वेळा अनुदान यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. यादीत जागोजाग व्हाईटनर लावून खाडाखोड करीत बदल करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी वंचित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. अजूनही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.यामुळे जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालून गोरगरिब शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पं .स. सदस्य नामदेव भारत कदम यांच्यासह पोखर्णी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.