चाराटंचाईही गंभीर..!
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:19:56+5:302014-06-29T00:38:55+5:30
ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही.

चाराटंचाईही गंभीर..!
ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे ईट परिसरात पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली असून, २५ रूपये दर देऊनही कडब्याची पेंढी मिळत नसल्याने पशुपालकांनी आता कडब्याला पर्याय म्हणून उसाची निवड केल्याचे दिसत आहे.
भूम तालक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. शिवाय तालुक्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगराळ असल्यामुळे चराऊ क्षेत्र मोठे आहे. तसेच रबी पिकाचा तालुका विशेषत: ज्वारीचे कोठार म्हणूनही ओळख असल्याने या तालुक्यात जनावरांसाठीचा कडबाही मुबलक उपलब्ध होतो. त्यामुळे या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दुधापासून खवा, खव्यापासून पेढा उत्पादन करणारी केंद्रे तसेच दूध संकलन केंद्रेही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यायाने दुभत्या जनावरांची संख्याही भरपूर आहे.
यंदाच्या रबी हंगामात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच ज्वारीचा कडबा भिजून काळा पडल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर निर्माण झाला आहे. वेळेवर पाऊस पडला तर हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येईल, या आशेवर शेतकरी होता. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यापाठोपाठ आता अद्रा नक्षत्रातील पाच दिवसही कोरडेच गेल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कडबा खरेदीसाठी पशुपालक गावोगावी फिरत असून, सध्या अडीच हजार रूपये प्रती शेकडा कडब्याची खरेदी केली जात आहे. जादा दर देऊनही कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांनी आता शेतातील उसाचाच चारा म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे. या भागात प्रतीगुंठा अडीच हजार रूपये दराने ऊस विकत घेतला जात असून, तोच जनावरांना चारा म्हणून दिला जात आहे. एकूणच पशुखाद्याने गगनाला भिडलेले भाव, चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न यामुळे या भागातील दुग्धव्यवसाय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)