आजोबाच्या कर्जाने घेतला वडिलांचा बळी

By Admin | Updated: January 9, 2015 00:50 IST2015-01-09T00:34:06+5:302015-01-09T00:50:09+5:30

लोहारा : सततचा दुष्काळ आणि वाढत जाणारा कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या लोहारा शहरातील मनोहर यल्लोरे (वय ५६) या शेतकऱ्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

The grandfather's debtor took the life of his father | आजोबाच्या कर्जाने घेतला वडिलांचा बळी

आजोबाच्या कर्जाने घेतला वडिलांचा बळी


लोहारा : सततचा दुष्काळ आणि वाढत जाणारा कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झालेल्या लोहारा शहरातील मनोहर यल्लोरे (वय ५६) या शेतकऱ्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. या घटनेला महिना झाला आहे. पत्नी भारताबाई यल्लोरे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली असून, अद्याप पर्यंत त्यांना शासनाची, लोकप्रतिनिधी तसेच कुठल्याही सामाजिक संस्थेची मदत मिळालेली नाही.
शहरातील शेतकरी मनोहर यल्लोरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे एक मुलगी असा परिवार आहे. त्याच्याकडे साडेबारा एकर जमीन आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. मोठा मुलगा व मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. २००७ मध्ये स्वत:चे भूकंप पुनर्वसनात मिळालेले घर विकून त्यांनी खाजगी कर्ज सारले. तेव्हापासून ते आजतागायत भाड्याच्या घरात राहतात. मनोहर सोसायटीचे दप्तर लिहून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. तीन ते चार वर्षापासून शेतात केलेल्या खर्चा इतकेही उत्पन्न मिळाले नाही. सध्या शेतात ज्वारी, करडी, हरभरा, लागवड केली आहे. मात्र त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला. मनोहर यांनी घटना घडायच्या अगोदर दोन दिवस उधारीवर औषधे घेऊन फवारणी केली होती. नेहमीच पैशाची चणचण भासू लागल्याने घरात तक्रारी वाढल्या होत्या. यातून पत्नी, मुलाबरोबर वाद होऊ लागला. त्यात शेतात नापीक वडील लक्ष्मण यांनी ३० जून २००८ मध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ६८ हजार पाचशे रुपयांचे कर्ज घेतले होते. सन २००९ मध्ये हे कर्ज थकित होते. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत या कर्जापोटी ६८ हजार पाचशे रुपये मुद्दल आणि ५३ हजार ४३० रुपये व्याज असे एकूण एक लाख २१ हजार ९३० रुपये देणे आहे. याशिवाय मनोहर यांच्या पत्नीच्या नावे महिला मंडळाच्या बचतगटाचे कर्ज अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, यामुळे ते सतत त्रस्त राहत होते.
यातून त्यांनी २ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान ४ डिसेंबर रोजी मनोहर यांचा मृत्यू झाला. मोठा मुलगा नागेश आपल्या बायकोला घेऊन लातूर येथे कामासाठी गेला. तर लहान मुलगा अनिल हा सकाळी पेपर विक्री करून त्यानंतर मेडिकल दुकानावर काम करीत आहे. पत्नी भारताबाई व लहान मुलगा अनिल हे दोघेही सध्या लोहारा येथेच वास्तव्यास आहेत. पतीच्या निधनाला महिना झाला. कसलेही संकट आले तरी आत्महत्या करणे हा पर्याय होऊच शकत नाही. त्यामुळे संकटकाळी शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता संकटाची हत्या करावी, असे भारताबाई यल्लोरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या. (वार्ताहर)

Web Title: The grandfather's debtor took the life of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.