‘एकजुटीची वज्रमूठ आवळून सत्ता हस्तगत करा’: खा. चंद्रकांत हंडोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:22 IST2025-01-15T17:21:36+5:302025-01-15T17:22:14+5:30
नामांतर योद्धा पुरस्कार वितरणाचा देखणा सोहळा

‘एकजुटीची वज्रमूठ आवळून सत्ता हस्तगत करा’: खा. चंद्रकांत हंडोरे
छत्रपती संभाजीनगर : विस्कळीत न राहता, थोडी समज आली की संघटना काढीत न बसता सर्वांनीच एकजुटीची वज्रमूठ आवळावी आणि सत्ता हस्तगत करून गोरगरीब, सर्वहारा वर्गाचे व दीनदलितांचे प्रश्न सोडवावेत, हे जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आहे, ते पूर्ण करावे, असे आवाहन मंगळवारी येथे राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री, भीमशक्तीचे सर्वेसर्वा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
यावेळी आता जे सत्तेत बसलेले आहेत, त्यांना मी उभे केले. पण, आजचा दिवस पवित्र आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर कॉमेंट करू इच्छित नाही, असा टोला नाव न घेता रामदास आठवले यांना त्यांनी लगावला. मला सामाजिक न्याय मंत्रिपदाची संधी मिळाली, तर किती कामे करता आली, याची यादीच त्यांनी यावेळी सादर केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या नामांतर योद्धा पुरस्कार सोहळ्यात ते जयभीमनगर, टाऊन हॉल येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्र. ज. निकम गुरुजी होते. प्रारंभी, मुख्य आयोजक रतनकुमार पंडागळे यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी, पुरस्कार वितरणानंतर प्रेरणा खरात या मुलीने ‘रमाई’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
डॉ. बाबा आढाव व साथी पन्नालाल सुराणा हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरस्कार स्वीकारायला येऊ शकले नाहीत. त्यांना पुण्यात जाऊन हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्राचार्य गजमल माळी यांचा नामांतर योद्धा हा पुरस्कार त्यांच्या पत्नी रमा माळी व चेतन माळी यांनी स्वीकारला. प्रा. एच. एम. देसरडा यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. माजी महापौर रशीदमामू, प्रा. सुशीला मोराळे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. अंकुश भालेकर, ग. मा. पिंजरकर, ॲड. धनंजय बोरडे, दिनकर ओंकार, संतोष भिंगारे, मिलिंद दाभाडे, गुड्डू निकाळजे, ॲड. शेख अनिक, आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. वैशाली पंडागळे हिने सूत्रसंचालन केले. संतोष पंडागळे यांनी आभार मानले.