चोरट्यांकडून १४ दुचाकी हस्तगत
By Admin | Updated: June 18, 2017 00:58 IST2017-06-18T00:56:07+5:302017-06-18T00:58:17+5:30
औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली.

चोरट्यांकडून १४ दुचाकी हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात यश आले.
योगेश ऊर्फ बाळू नागनाथ बाण (२२, रा. बाणाची वाडी, ता. परतूर, जि. जालना) आणि नाथा गौतम भदरगे (रा. संकनपुरी, ता. परतूर), अशी अटकेतील आरोपींची
नावे आहेत.
गुन्हा शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणारे आरोपी आष्टी येथे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी याविषयी कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संतोष सोनवणे आणि पथक स्थापन केले. या पथकाने तपास करून दोन्ही आरोपींना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत दडवून ठेवलेल्या आणखी चार मोटारसायकली पोलिसांच्या
हवाली केल्या.
४ लाख २० हजार रुपयांच्या चोरीच्या तब्बल १४ दुचाकी आजपर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. त्या गुन्ह्यात ते सध्या अटकेत आहेत. पोहेकॉ. सोनवणे, विश्वास शिंदे, सुधाकर शिंदे, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, लालखाँ पठाण, धर्मराज गायकवाड यांनी ही कारवाई केली.