शासकीय ‘नर्सिंग’च्या मुलींना थेट नोकरी
By Admin | Updated: July 9, 2014 00:31 IST2014-07-08T23:10:50+5:302014-07-09T00:31:54+5:30
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नर्सिंग स्कूलमधून दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना थेट शासकीय नोकरी देण्यात येणार आहे़

शासकीय ‘नर्सिंग’च्या मुलींना थेट नोकरी
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नर्सिंग स्कूलमधून दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना थेट शासकीय नोकरी देण्यात येणार आहे़ त्यासाठी नोकर भरतीच्या कायद्यात बदल करण्यात येईल़ मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी येथे सांगितले़
लातूर येथील आरोग्य संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन आणि बाभळगाव येथील शासकीय नर्सिंग स्कूल व वसतिगृह इमारतीचे उद्घाटन मंगळवारी झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ लातूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ़डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर होते तर बाभळगाव येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ़दिलीपराव देशमुख होते़ मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, आ़वैैजनाथ शिंदे, जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, धीरज देशमुख यांची उपस्थिती होती़ यावेळी आरोग्य मंत्री शेट्टी म्हणाले, शासनाकडून नर्सिंग स्कूलची सोय केली जाते़ परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची हमी दिली जात नाही़ ही बाब लक्षात घेवून शासकीय नर्सिंग स्कूल मधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना थेट नोकरी मिळावी अशी व्यवस्था केली जात आहे़ राजीव गांधी जिवनदायी योजनेच्या माध्यमातून सर्वांना मोफत वैैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे़ नागरिक सक्षम बनावा म्हणून राज्य शासन विविध योजना राबवित आहे, असेही आरोग्य मंत्री शेट्टी म्हणाले़
राज्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, बाभळगाव येथील शासकीय नर्सिंग स्कूल व वसतिगृह लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील उपक्रम आहे़ त्यांनी मुख्यमंत्री असताना या उपक्रमाला मान्यता दिली़ या स्कूलमध्ये आणखी २० जागांना मान्यता द्यावी, अशी मागणी राज्यमंत्री देशमुख यांनी यावेळी केली़ प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़एस़बीक़ोरे यांनी केले़ (प्रतिनिधी)
बाभळगाव राजकीय तीर्थक्षेत्ऱ़़
महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जाऊन प्रकल्प, वास्तू योजनांचे उद्घाटन झाले की, हा प्रकल्प विलासराव देशमुख यांनी मंजूर केलेला आहे असे ऐकावयास मिळते़ बाभळगाव येथे शासकीय नर्सिंग स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी विलासराव देशमुख यांची आठवण प्रकर्षाने होते़ खरेतर बाभळगाव हे राजकीय तीर्थक्षेत्रच आहे, असे मतही आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी व्यक्त केले़