शासकीय वसतिगृहांना बारा वर्षांपासून दुरुस्तीची प्रतीक्षा; एखाद्याचा जीव गेल्यास जाग येणार का?
By विजय सरवदे | Updated: April 16, 2024 18:38 IST2024-04-16T18:36:45+5:302024-04-16T18:38:48+5:30
किलेअर्क परिसरात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे.

शासकीय वसतिगृहांना बारा वर्षांपासून दुरुस्तीची प्रतीक्षा; एखाद्याचा जीव गेल्यास जाग येणार का?
छत्रपती संभाजीनगर : मागील बारा वर्षांपासून किलेअर्क परिसरातील शासकीय वसतिगृहांची दुरुस्तीच झालेली नाही. वसतिगृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी अनेकदा जखमीही झाले आहेत. दरम्यान, समाजकल्याण विभागाने बांधकाम विभागाच्या सहकार्याने अडीच कोटींचा सुधारित प्रस्ताव पुणे येथील आयुक्त कार्यालयाकडे सादर केला; मात्र तो चार महिन्यांपासून प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत पडून आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावरच समाजकल्याण आयुक्तालयास जाग येणार आहे का, असा सवाल आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
किलेअर्क परिसरात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. तेथील इमारतीत वसतिगृहांचे पाच युनिट चालतात. काही महिन्यांपासून तेथे मुलांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) सातत्याने नादुरुस्त होते. खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, काचा, कडीकोयंडे तुटलेले आहेत. जानेवारीमध्ये दोन नंबरच्या युनिटमध्ये ‘बी-२१’ या खोलीत अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर छताच्या स्लॅबचे तुकडे कोसळले. या घटनेत तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी समाजकल्याण प्रशासनाचे दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
दरम्यान, वसतिगृहाचे पाचही युनिट सन २०११ पासून वापरात आहेत. आता जवळपास १३ वर्षांचा कालावधी होत आला असून, वसतिगृहाची डागडुजी करणे गरजेचे आहे. यामुळेच समाजकल्याण विभागाच्या स्थानिक प्रशासनाने इमारतींची तपासणी करून दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तालयाकडे सादर केला होता. मात्र, त्यात काही त्रुटी असल्यामुळे तो प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे परत आला. बांधकाम विभागाने त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव पाठविला; पण तो आजपर्यंत आयुक्तालयातच रखडला आहे. आता निवडणूक आचारसंहितेनंतरच जून-जुलैमध्ये त्यास मुहूर्त मिळू शकेल, असा अंदाज प्रशासनाने लावला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटला लागला मुहूर्त
पदमपुरा परिसरात वसतिगृहासाठी १९६२ मध्ये बांधण्यात आलेली एक इमारत २५० विद्यार्थिनी क्षमतेची, तर लागून १९८२ मध्ये उभारण्यात आलेली दुसरी तीन मजली इमारत १७५ विद्यार्थिनी क्षमतेची आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वीच या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, या इमारती विद्यार्थिनींसाठी राहण्यायोग्य नसल्याचा अभिप्राय बांधकाम विभागाने दिला आहे. त्यानुसार सध्या एक वसतिगृह किरायाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.