छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या (राज्य कर्करोग संस्था) विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि टू बीम युनीटचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतिष चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली.
ट्रू बीम लिनियर ॲक्सलेटर प्रणालीशासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. रेडिएशन ऑनकोलॅाजी विभाग वर्ष १९८१ पासून कर्करूग्णांच्या सेवेत आहे. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. येथे त्यांच्यावर महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात.