गोरोबाकाकांची मूर्ती घोड्यावर स्वार
By Admin | Updated: May 24, 2017 00:35 IST2017-05-24T00:34:12+5:302017-05-24T00:35:42+5:30
तेर : संत गोरोबाकाकांच्या अपरा एकादशीनिमित्त काकांच्या समाधीस चंदनाची उटी लावून मूर्ती घोड्यावर स्वार झाल्याचा देखावा साकारण्यात आला.

गोरोबाकाकांची मूर्ती घोड्यावर स्वार
लोकमत न्यूज नेटवर्क
तेर : संत गोरोबाकाकांच्या अपरा एकादशीनिमित्त काकांच्या समाधीस चंदनाची उटी लावून मूर्ती घोड्यावर स्वार झाल्याचा देखावा साकारण्यात आला. यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी हा क्षण डोळ्यात साठविला.
सोमवारी संत गोरोबाकाकांची अपरा एकादशी होती. मंगळवारी पहाटे चंदनाची उटी लावण्यात येते. वैशाखात वणव्यात काकांच्या समाधीला गारवा मिळावा म्हणून अंदाजे ४ किलो चंदन उगळण्यात येते. साधारण एक महिन्यापासून चंदन उगळण्यात येते. यंदा काकांची मूर्ती चार फूट उंचीच्या घोड्यावर स्वार होती. एका हातात तलवार, तर एका हातात वीणा अशा स्वरुपाचा काकांच्या मूर्तीचा हा देखावा पाहण्यासाठी हजारो भाविक सोमवारपासून मंदिरात रात्रभर मुक्कामास होते. विशेष मानकऱ्यांनी हा देखावा तयार केला. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी पहाटे अडीच वाजल्यापासूनच रांगेत उभे होते़ उटीची महापूजा आरती जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर, मंदिराचे पुजारी रघुनंदन महाराज पुजारी, गुरुसिद्धप्पा कानडे, गोविंद महाराज पांगारकर, हभप कुमार ढोराळकर यांच्या हस्ते करून पहाटे ४.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते़ यावेळी तालुक्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक उपस्थित होते़