गोपीनाथरावांचे होते परभणीवर विशेष लक्ष...
By Admin | Updated: June 4, 2014 00:44 IST2014-06-04T00:39:29+5:302014-06-04T00:44:58+5:30
परभणी : ज्या बीड जिल्ह्यातून गोपीनाथराव मुंडे राष्टÑीय पातळीवर पोहोचले, त्या बीडच्या शेजारील परभणी जिल्ह्यावरही गोपीनाथरावांचे विशेष लक्ष असायचे.
गोपीनाथरावांचे होते परभणीवर विशेष लक्ष...
परभणी : ज्या बीड जिल्ह्यातून गोपीनाथराव मुंडे राष्टÑीय पातळीवर पोहोचले, त्या बीडच्या शेजारील परभणी जिल्ह्यावरही गोपीनाथरावांचे विशेष लक्ष असायचे. कोणत्याही आंदोलनाला बळ मिळविण्यासाठी अनेक वेळा गोपीनाथरावांनी परभणीत सभा घेतल्या. त्यांच्या सभांना प्रतिसादही मोठा मिळायचा आणि यातूनच गोपीनाथराव आणि परभणी जिल्हा असे एक वेगळे नाते निर्माण झाले. गोदा परिक्रमा असो की संघर्ष यात्रा किंवा ऊस- कापसाचे आंदोलन असो. या जिल्ह्याने नेहमीच त्यांना साथ दिली आहे. बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून वर्णी लागली. या माध्यमातून आता मराठवाड्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून विकास होईल, अशी सर्वसामान्यांना खात्री होती. परंतु आज सकाळी मुंडे यांच्या निधनाची दु:खद बातमी आली आणि परभणीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त जिल्हाभर वार्यासारखे पसरले. जो तो एक-दुसर्याशी या दु:खद घटनेची विचारपूस करुन ‘फार वाईट’ झाले अशी भावना बोलून दाखवित होता. मुळात गोपीनाथराव बीड जिल्ह्यातले असले तरी परभणी जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. परभणी जिल्ह्यावर असलेल्या त्यांच्या विशेष प्रेमामुळे या जिल्ह्यातील सामान्य माणसालाही गोपीनाथराव जवळचे वाटायचे. या भावनेतूनच आज मुंडे यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र शोकभावना व्यक्त होऊ लागल्या. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी आदींनी मुंडे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करुन आपले आणि मराठवाड्याचे फार नुकसान झाले, असे बोलून दाखविले. गोपीनाथराव कोणत्याही कार्यक्रमाच्या, निवडणुकीच्या किंवा आंदोलनाच्या निमित्ताने परभणीला येत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत यातूनच या जिल्ह्यातील अगदी तळागाळातील कार्यकर्ताही मुंडेशी जुळला होता. राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून मुंडे यांचे परभणी आणि या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडे विशेष लक्ष होते. गोदापरिक्रमा, संघर्ष यात्रा, शेतकर्यांची कर्जमाफी, वेगवेगळ्या निवडणुका, ऊस, कापूस दराचे आंदोलन, समाज मेळावे आदींच्या निमित्ताने मुंडे परभणी जिल्ह्यात अनेकदा आलेले आहेत. याशिवाय कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमासही गोपीनाथराव आवर्जून उपस्थित रहायचे. यामुळे कार्यकर्त्यांचा ऊर भरुन यायचा. या संदर्भातील मुंडे यांच्या सहवासातील आठवणी सांगून कार्यकर्त्यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (प्रतिनिधी)महायुतीचे शिल्पकार म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे बघितले जायचे. महायुतीच्या कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी गोपीनाथराव परभणीत आवर्जून यायचे. विशेषत: आपल्या समाजबांधवांची संख्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत ते जिंतूर, गंगाखेडला जाहीर सभा घ्यायचे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून गोपीनाथरावांचे परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष होते. यामुळेच परभणीकरांनाही गोपीनाथराव कधी परके वाटले नाहीत. त्यांच्या निधनामुळे केवळ बीड जिल्ह्याचाच नव्हे, तर आपलाही पालक काळाच्या पडद्याआड गेला, अशा भावना परभणीकरांनी व्यक्त केल्या.