गोपीनाथगडावर कार्यक्रम; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री येणार
By Admin | Updated: June 3, 2017 00:37 IST2017-06-03T00:35:21+5:302017-06-03T00:37:17+5:30
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ३ जून रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.

गोपीनाथगडावर कार्यक्रम; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ३ जून रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
गोपीनाथगडावर १५० बाय २५० फूट आकाराचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासदार, आमदार, भाजपचे पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते गडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तशी व्यवस्था आली आहे. आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, महाप्रसाद इ.चे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आणि त्यानंतर दुपारी १२.३० मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.प्रीतम मुंडे, अॅड.यशश्री मुंडे यांनी केले आहे.
गोपीनाथगडावर अपंगांना स्वयंचलित स्कूटर, व्हील चेअर, सायकल, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, अल्प दृष्टींना मोबाईल कीटचे वाटप करण्यात येणार आहे. जीवनज्योती योजनेंतर्गत महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. तसेच घरगुती गॅसचे वाटप केले जाईल. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. इतरही विविध कार्यक्रम येथे पार पडणार आहेत.