भल्या माणसा, आता तरी झाड लाव
By Admin | Updated: July 5, 2014 00:40 IST2014-07-05T00:14:30+5:302014-07-05T00:40:24+5:30
लातूर : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात थेंबभरही पाऊस झाला नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाची चिंता वाढली आहे.
भल्या माणसा, आता तरी झाड लाव
लातूर : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात थेंबभरही पाऊस झाला नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाची चिंता वाढली आहे. पावसासाठी आता देवाकडे धावाही केला जातोय. परंतु, पावसास अनुरुप पर्यावरणाची निर्मिती करण्याकडे मात्र अनेकांचे दुर्लक्षच आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतरच आपणास वृक्ष लागवड अन् संवर्धनाचे महत्व कळते. त्यामुळे ठिकठिकाणी लागवडही सुरू होते. परंतु, एकदा का पाऊस पडला की, आपणच लागवड केलेल्या वृक्षाचा आपणास विसर पडतो. त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आपणास वाटत नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे आपली अवस्था आहे. ‘लोकमत’ने पर्यावरण जागरुकतेविषयी केलेल्या सर्वेक्षणातून नागरिकांचे वृक्ष लागवड व संवर्धनाविषयीची अनास्था आहे. पर्यावरणाची जागरुकता वाढत असल्याचे वरकरणी वाटत असले, तरी संवर्धनाकडे दुर्लक्ष आहे, हेच यातून पुढे आले आहे.
वृक्ष लागवड व संवर्धन या विषयावर ‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातून दोनशे नागरिकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून पर्यावरणाविषयीची जागरुकता वाढत असल्याचे अधोरेखित होत असतानाच वृक्ष लागवडीनंतर त्याच्या संवर्धनाकडे मात्र काहिसे दुर्लक्ष होत असल्याचेही समोर आले आहे.
आतापर्यंत आपण किती झाडे लावली, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ४६ टक्के जणांनी एक ते पाच पर्यंत वृक्षांची लागवड केल्याचे सांगितले आहे. पाच ते दहापर्यंत झाडे लावणाऱ्यांची संख्या २४ टक्के, दहापेक्षा अधिक झाडे लावणाऱ्यांची संख्या २२ टक्के आहे, तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६ टक्के नागरिकांनी आतापर्यंत एकही झाड लावले नसल्याचे स्पष्टपणे कबूल केले आहे.
साधारणत: फळांची झाडे लावण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. कोणत्या प्रकारची झाडे लावली, या प्रश्नाला उत्तर देताना ४२ टक्के नागरिकांनी फळांची झाडे लावल्याचे नमूद केले आहे. ३० टक्के नागरिकांनी सावलीची झाडे लावली, तर २८ टक्के नागरिकांनी शोभेची झाडे लावली आहेत.
वृक्ष लागवड केल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे कसे दुर्लक्ष होते, हेही या सर्वेक्षणातून समोर आले. आपण लावलेले झाड जगले काय, या प्रश्नाचे पर्याय निवडताना ५८ टक्के नागरिकांनी झाड जगल्याचे सांगितले आहे. परंतु, २२ टक्के नागरिकांनी लागवड केलेले वृक्ष जगले नसल्याचे सांगितले आहे. तर २० टक्के नागरिकांना त्यांनी लावलेल्या झाडांचे पुढे काय झाले, याची माहितीच नाही.
सामान्यत: वृक्ष लागवडीचे ठिकाण निवडताना नागरिकांनी घराचे अंगण व शेतीला पसंती दिली आहे. वृक्ष लागवड कोणत्या ठिकाणी केली, याबाबत सांगताना ४० टक्के नागरिकांनी घराच्या अंगणात वृक्ष लागवड केल्याचे सांगितले आहे. तर ३८ टक्के नागरिकांनी शेतात झाड लावले आहे. १० टक्के नागरिकांनी रस्त्याशेजारी झाडे लावली. तर १२ टक्के नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड केल्याचे सांगितले आहे.
स्वत: वृक्ष लागवड करण्यासोबतच त्याबाबत जनजागृती व इतरांना प्रेरित करण्यात आपण मागे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. वृक्ष लागवडीसाठी इतरांना प्रेरित केले काय, या प्रश्नावर ३६ टक्के नागरिकांनी ‘होय’ असे उत्तर दर्शविले आहे. तर ३० टक्के नागरिकांनी स्पष्टपणे इतरांना प्रेरित केले नसल्याचे सांगितले. ३४ टक्के नागरिकांनी मात्र याबाबत निश्चित सांगता येणार नाही, या पर्यायाची निवड केली आहे.