संघाचा जानेवारीत महासंगम
By Admin | Updated: December 25, 2014 00:46 IST2014-12-25T00:35:29+5:302014-12-25T00:46:51+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संघाचा जानेवारीत महासंगम
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०१५ रोजी आयोजित या महासंगमात ११ जिल्ह्यांतील ३० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक हजर राहणार आहेत.
१९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. पुढील वर्षी संघ ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत ‘देवगिरी महासंगम’ शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवार येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेवर शिबीर होणार आहे. सुमारे ९५ एकर जागेवर या महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील ८ व खान्देशातील ३, असे ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक एकत्र येत आहेत. या सोहळ्याचे नियोजन मागील दीड वर्षापासून सुरू आहे.
मैदानावर मंडप उभारण्याचे काम ३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. येथील मैदानाला धर्मवीर संभाजी महाराज नगरी, असे नाव देण्यात आले आहे. मैदानात निवासासाठी १५ एकरांवर १५ कक्ष उभारण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. चार मोठ्या जिल्ह्यांसाठी दोन कक्ष असणार आहेत. प्रत्येक निवासी कक्षाच्या बाजूला एक स्वयंपाकगृह उभारण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमासाठी ४० एकर जागेवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यासाठी ७ ते ८ एकराची जागा सोडण्यात आली आहे. १० एकर जागेवर पार्किंग करण्यात येणार आहे. याशिवाय चार मिनी दवाखाने, अॅम्ब्युलन्सची व्यवस्था असणार आहे. ५ जानेवारीपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण होईल, यासाठी २२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याद्वारे ६०० स्वयंसेवक संपूर्ण व्यवस्था करीत आहेत, अशी माहिती आखणीप्रमुख जगन्नाथ गुळवे यांनी दिली.
११ जानेवारी रोजी आयोजित देवगिरी महासंगम सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य सोहळा सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी १२ वाजेपर्यंत ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक मैदानात दाखल होणार आहेत.
२ ते ३.३० वाजेदरम्यान जिल्हानिहाय सत्र होणार आहेत. ४.३० वाजता संघाच्या गणवेशात स्वयंसेवक मैदानात हजर होतील. सायंकाळचा मुख्य कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे यांनी दिली.