गोदाकाठ तहानलेलाच
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:49:40+5:302014-08-23T00:45:52+5:30
दगडू सोमाणी, गंगाखेड पावसाने चक्क पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठचा भाग तहानला असून डोंगरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत.

गोदाकाठ तहानलेलाच
दगडू सोमाणी, गंगाखेड
चालू वर्षाच्या पावसाळी हंगामात पावसाने चक्क पाठ फिरविल्यामुळे तालुक्यातील गोदाकाठचा भाग तहानला असून डोंगरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. भूजल पातळीत झपाट्याने घट झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी ३१ तालुक्याच्या भूजल पातळीत घट झाली आहे़ तालुक्यातील भूजलपातळी दीड मीटरपेक्षा अधिक पाणी पातळी घटल्याचा अहवाल यंत्रणेने सादर केला आहे. मुख्य पावसाळ्यात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी घटीचा उलटा प्रवास सुरू झाल्याने भविष्यातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असल्याचे निर्देश जेएसबीए यंत्रणेने दिले आहेत. गंगाखेड तालुक्याची क्षेत्रफळानुसार गोदाकाठचा सुपीक व डोंगरी अशा दोन भागात विभागणी होेते. गोदाकाठच्या भागात गोदावरी पात्रात मुळी येथे बंधारा असल्यामुळे मुळी, दुस्सलगाव, खळी, चिंच टाकळी, महातपुरी, गौंडगाव, पोंहडूळ आदी भागात पाण्याची पातळी टिकून आहे. मात्र गंगाखेड, धारखेड, झोला, पिंपरी, नागठाणा, धसाडी, अंगलगाव, मसला आदी गावे गोदाकाठावर असून नदीच्या पात्रात पाण्याचा ठणठणाट असल्याने पावसाळ्यातही ही गावे तहानली आहेत. या परिसरातील सुपिक भागात असणाऱ्या ४० ते ५० गावातील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. दरवर्षी गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन ते चार वेळा पूर येत असल्यामुळे जमिनीतील भूजल पातळीत वाढ होत होती. मात्र यावर्षी मागील २० ते २५ वर्षानंतर प्रथमच पावसाळी हंगामात पूर तर सोडाच नदीच्या पात्रात साधे पाणी सुद्धा आले नाही. याहीपेक्षा बिकट अवस्था डोंगरी भागातील ग्रामस्थांची झाली आहे. यावर्षीचे पर्यजन्यमान आजपर्यंत केवळ २० टक्के झाल्याने भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घट होत आहे.
डोंगरी भागात असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त असा १९ टक्के जलसाठा आहे. मासोळी प्रकल्पातून गंगाखेड शहर, गंगाखेड शुगर कारखाना व अन्य १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध पाणी साठा केवळ एक ते दोन महिन्यांचा असून भविष्यात मासोळी प्रकल्पावर विसंबून असलेल्या गंगाखेड शहरासह अन्य पंधरा ते वीस गावांना पावसाळा संपण्यापूर्वीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्यात सहा लघू प्रकल्प आहेत. यापैकी तांदूळवाडी २४ टक्के, राणीसावरगाव २० टक्के, टाकळवाडी ५ टक्के, पिंपळदरी ३३ टक्के तर कोद्री व नखतवाडी येथे ० टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा वर्ष २०१३ मधील आहे. यावर्षी लघू प्रकल्पातील पाणी साठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. वर्ष २०१३ मध्ये ही सर्व लघू प्रकल्प आॅगस्ट अखेरपर्यंत १०० टक्के भरली होती.
गंगाखेड तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७०० मि. मी. एवढी आहे. २१ आॅगस्टपर्यंत केवळ १२८ मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील मुख्य पाऊस पडणारी नक्षत्र कोरडी गेली. यापुढे मोठ्या पावसाची अपेक्षा धुसूर झाल्याने भूजल पातळीत वाढ होण्याची अपेक्षा कमी आहे. शेवटी निसर्गाची कृपादृष्टी झाली तरच भूजल पातळी वाढीची अपेक्षा करता येईल अन्यथा तालुक्यातील गोदाकाठ व डोंगरी भागात भीषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याचे दृष्टीक्षेपात येत आहे.