महापालिकेच्या सायकल खरेदीत गौडबंगाल
By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:28:27+5:302014-07-22T00:37:04+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या खरेदी किमतीवरून तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या सायकल खरेदीत गौडबंगाल
औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या खरेदी किमतीवरून तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे. उद्या २२ रोजी वाटप होणार असून, अंदाजे ३ हजार रुपयांची सायकल ३ हजार ८३१ रुपयांना पालिकेने कशी काय खरेदी केली, असा सवाल सभापती विजय वाघचौरे यांनी आज केला. त्यांनी आज सायकलींची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अनिल जैस्वाल, जगदीश सिद्ध, महिला व बालकल्याण कक्षप्रमुख डॉ.पे्रमलता कराड यांची उपस्थिती होती.
२२ रोजी सकाळी ११ वा. कला दालन, टाऊन हॉल येथे महापौर कला ओझा यांच्या हस्ते सायकलींचे वाटप होणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोण आहे पुरवठादार
अहमदनगर येथील संजय ट्रेडर्स या संस्थेने सायकली पुरविल्या आहेत. ३ हजार ८३१ रुपयांना ती सायकल मनपाने खरेदी केली आहे. बाजारात ३ हजार रुपयांपासून सायकल उपलब्ध आहे. खरेदी केलेल्या सायकल २३ लाख ७५ हजार २२० रुपयांच्या आहेत. या सायकलींची किंमत १८ लाख रुपये आहे मात्र मनपाने ५ लाख ४९ हजार रुपये जास्तीचे का दिले असा प्रश्न आहे.
आल्या असत्या ७५० सायकली
३ हजार रुपयांच्या किमतीनुसार सायकली खरेदी केल्या असत्या तर अंदाजे ७५० सायकली आल्या असत्या. मनपा सध्या ६१६ विद्यार्थिनींना सायकली देणार आहे. त्यात १३४ विद्यार्थिनींची आणखी भर पडली असती. तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीमध्ये चांगली बॅ्रण्डेड सायकल येत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
अधिकाऱ्यांचा दावा असा...
महिला व बालकल्याण विभागाच्या कक्षप्रमुख डॉ.पे्रमलता कराड म्हणाल्या, सायकलींची गुणवत्ता पॉलिटेक्निक कॉलेजकडून तपासली आहे. १ महिनाभर गुणवत्ता तपासणी सुरू होती. आयएसआय ट्रेडमार्क असलेल्या सायकली खरेदी केल्या आहेत.
२०० सायकली मनपा शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४१६ सायकली या नगरसेवकांच्या शिफारशीनुसार वाटप होतील.
दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनीला ४०० रुपये, तर दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थिनीला ६०० रुपये रक्कम मनपात जमा करावी लागेल. सोबत नगरसेवकाचे शिफारसपत्र लागेल. प्रत्येक नगरसेवकाच्या वाट्याला ४ सायकली येतील. मनपात १०४ नगरसेवक आहेत.