गोडंबीने दिला आदिवासी महिलांना रोजगार
By Admin | Updated: June 5, 2014 01:08 IST2014-06-05T00:54:47+5:302014-06-05T01:08:49+5:30
दत्ता जोशी, घाटनांद्रा सध्याच्या आधुनिक युगात साधारण कामासाठीसुद्धा यंत्रांची मदत घेतली जात असताना गोट्यातून निघणारी गोडंबी आजही जीव धोक्यात घालून हाताने फोडून तयार करावी लागत आहे.
गोडंबीने दिला आदिवासी महिलांना रोजगार
दत्ता जोशी, घाटनांद्रा सध्याच्या आधुनिक युगात साधारण कामासाठीसुद्धा यंत्रांची मदत घेतली जात असताना गोट्यातून निघणारी गोडंबी आजही जीव धोक्यात घालून हाताने फोडून तयार करावी लागत आहे. बदामापेक्षा जास्त शक्तिवर्धक आणि पौष्टिक असलेल्या या गोडंबीचे महत्त्व आगळेवेगळे असून, प्रसूत झालेल्या महिलेस किंवा मोठी शस्त्रक्रिया झालेल्यांना ती दिली जाते. अशी ही गोडंबी तयार करण्यासाठी आदिवासी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते. जंगलात बिब्यांच्या झाडांना बिबे येतात. या बिब्याच्या खाली काळ्या रंगाचे गोटे असतात. बिबे तोडून घरी आणून गोटे तोडावे लागतात. गोटे वाळल्यानंतर हाताला कपडे बांधून फोडावे लागतात. हे गोटे फोडताना निघणारे तेल विषारी असते. ते तेल अंगावर पडल्यास जखमा होतात. गोटे फोडणे अपायकारक असूनही केवळ चारितार्थासाठी कोळी समाज हा पारंपरिक व्यवसाय करतो, असे अलकाबाई बावस्कर, तुळसाबाई, कडूबाई, जिजाबाई या महिलांनी सांगितले. झाडावरील गोटे विकत घेऊन ते फोडावे लागतात व गोटे फोडल्यानंतर निघणारी गोडंबी बाजारात चारशे ते पाचशे प्रति किलो विक्री केली जाते. गोटे चांगले असल्यास एका दिवसात अर्धा ते एक किलो गोडंबी फोडली जाते. गोटे फोडताना डोळ्यावर होतो मोठा परिणाम शेतकर्यांना गोट्याचे पैसे देऊन या महिलांना दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांपर्यंत मजुरी मिळते. हे गोटे फोडताना डोळ्यावर मोठा परिणाम होत असून, त्यामुळे आंधळेपणा येण्याचीही शक्यता असल्याची माहिती या महिलांनी दिली. मिळणार्या तोकड्या मजुरीमुळे हा समाज आजही शासनाच्या विविध सवलतींपासून वंचित असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. घाटनांद्रा गावात २५ ते ३० महिला हा जीवघेणा हंगामी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने लक्ष देण्याची मागणी गयाबाई बावस्कर, अंजनाबाई म्हातारजी, मीराबाई दशरथ, कडूबाई बावस्कर, सारजाबाई बावस्कर व इतर महिलांनी केली आहे.