गोदाकाठचा झंझावात शांत !
By Admin | Updated: April 4, 2016 00:37 IST2016-04-04T00:23:39+5:302016-04-04T00:37:13+5:30
स्वच्छ चारित्र्य, लष्करी शिस्त, अभ्यासू दूरदृष्टी, सतत विकासाचा ध्यास असलेले लोकनेते माजी खा. अंकुशराव टोपे काळाच्या पडद्याआड गेल्याने जिल्ह्यातील सहकार व शैक्षणिक क्षेत्र पोरके झाले आहे.

गोदाकाठचा झंझावात शांत !
स्वच्छ चारित्र्य, लष्करी शिस्त, अभ्यासू दूरदृष्टी, सतत विकासाचा ध्यास असलेले लोकनेते माजी खा. अंकुशराव टोपे काळाच्या पडद्याआड गेल्याने जिल्ह्यातील सहकार व शैक्षणिक क्षेत्र पोरके झाले आहे.
अंकुशराव टोपे यांचा जन्म १८ सप्टेंबर १९४२ रोजी अंबड तालुक्यातील पाथरवाला बु़ या ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या गावात सामान्य परिस्थिती असलेल्या रावसाहेब टोपे व सागरबाई टोपे यांच्या शेतकरी कुटुंबात झाला़ रावसाहेब टोपे गावाचे पोलीस पाटीलही होते. जालना येथून ६० तर शहागड येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथरवाला या मूळ गावात टोपे यांचे इयत्ता तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले. इयत्ता ४ थी ते ९ वीपर्यंत जालना, त्यानंतर १० वी व महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद शहरात घेतले. पीयूसीचे शिक्षण औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयात केले. बी.एस्सी.साठी शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.एस्सी. प्रथम वर्षात शिकत असताना त्यांनी एन.सी.सी.त भाग घेतला व सतत तीन वर्षे बेस्ट कॅडेट हा किताब पटकावला. एन.सी.सी.मधील सार्जन्ट पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याकाळी एन.सी.सी.चे वार्षिक कॅम्प अत्यंत कठीण असत. एन. सी. सी.कॅडेट व लष्करी जवान यांना एकत्रितरीत्या तो आर्मी अॅटचमेंट कॅम्प करावा लागे. तेव्हापासून टोपे यांना लष्करी शिस्तबध्द जीवनाचे आकर्षण निर्माण झाले ते शेवटपर्यंत कायम राहिले. याच काळात त्यांनी पायलट पदाच्या प्रशिक्षणासाठी अर्जही केला. मात्र वडीलांच्या नकारामुळे पायलट होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
बी.एस्सी.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टोपे यांनी कायद्याच्या पदवीसाठी औरंगाबादेतील माणिकचंद पहाडे महाविद्यालयात प्रवेश घेतला. लॉच्या पहिल्याच वर्षी ते वर्गप्रतिनिधी झाले. नंतरच्या वर्षी विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदाची (प्रेसिडेंट) निवडणूक त्यांनी लढविली. ही त्यांच्या जीवनातील पहिली निवडणूक. या निवडणुकीला त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा सुध्दा म्हणता येईल. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यात एका मताने ते निवडून आले व माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजचे प्रेसिडेंट बनले. पदवी घेतल्यानंतर विधी व्यवसायात करिअर करण्याच्या दृष्टीने त्यांनी औरंगाबाद येथील न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला़ १९६७ मध्ये ते तत्कालिन औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढले व जिकंले. ही निवडणूक त्यांच्या सक्रीय राजकारणातील पहिले पाऊल होय. जि.प.सदस्याबरोबरच त्यांची वकीली पेशाही सुध्दा सुरु होता. यानंतर २६ जानेवारी १९७२ रोजी अंबड विधानसभेसाठी उमेदवार म्हणून टोपे यांचे नाव जाहीर झाले व याच दिवशी त्यांनी औरंगाबाद न्यायालयातील वकील म्हणून आपले काम थांबविले. याच दरम्यान तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबासाहेब निबांळकर यांची पुतणी व निवृत्तीराव निंबाळकर यांच्या कन्या शारदाताई यांच्याशी त्यांचा ५ एप्रिल १९६७ रोजी अहमदनगर येथे विवाह संपन्न झाला. १९७२ च्या ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीत तत्कालीन बलाढ्य नेते अण्णासाहेब उढाण यांना पराभूत करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांचा प्रचंड प्रभाव होता. मात्र १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर टोपे व शरद पवार यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. ही जवळीक त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही दलाच्या (पुलोद) तिकीटावर त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर १९९१ मध्ये त्यांना जालना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाली व या निवडणुकीत टोपे भरघोस मतांनी खासदार म्हणून निवडून आले. खासदार असताना जालना लोकसभा मतदार संघातील महत्वाचे प्रश्न त्यांनी संसदेत हिरीरिने मांडले. त्याच बरोबरच मराठवाड्यातील प्रश्नांनाही संसदेत वाचा फोडली. त्यावेळी मनमाड ते औरंगाबाद पर्यंतचा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज पूर्ण करण्यात आला. मात्र औरंगाबाद-जालना हा रेल्वे ट्रॅक रेल्वे बजेटमधून मीस झाला होता. त्यावेळी जाफर शरीफ रेल्वेमंत्री होते. त्यांनी जाफर शरीफ यांना नकाशा दाखवून ही बाब निदर्शनास आणून दिली. याची नोंद घेत रेल्वे मंत्रालयाने एका वर्षात औरंगाबाद-जालना रेल्वेमार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण केले. खासदार असताना १९९५ मध्ये दिल्ली येथे त्यांना पहाटे पाच वाजता हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. त्यावेळी त्यांचे अटेंडंट एकनाथ पवळ यांनी त्याना तात्काळ राम मनोहर लोहिया हॉस्पिटलध्ये दाखल केले. या हॉस्पीटलमधील उपचारानंतर त्यांच्यावर लंडन येथे पाहिली बायपास सर्जरी करण्यात आली होती.
त्यांनी १९८० मध्ये समर्थ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली़ त्यांच्यामुळे जिद्द, चिकाटी, धडाडी व काटकसर अशी ओळख ‘समर्थ’ने सहकार क्षेत्रात निर्माण केली आहे़ यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे़ त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव देणारा एकमेव कारखाना अशी समर्थ सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यातील सामान्य माणसाला रोजगार मिळाला़ आज समर्थकडे चार हजार कर्मचारी काम करत आहेत़ गुणवत्तेच्या आधारे दीड हजार शिक्षकांची निवड करून सक्षम दृष्टीने मत्स्योदरी शिक्षण संस्थेची वाटचाल सुरू आहे़ मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या एकूण ८० शाखा विविध गावांमध्ये कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, उद्योग आदी महत्त्वपूर्ण क्षेत्रात मत्स्योदरीचे विद्यार्थी खंबीरपणे उभे असलेले दिसून येतात़ यामुळेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेला उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार ्र शासनाने दिला व संस्थेस गौरविण्यात आले़ त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने सहकाररत्न हा पुरस्कार २००८ मध्ये देऊन गौरविण्यात आले़
(संकलन- रवी गात/राजू छल्लारे)