'शिंदेसेनेच्या कार्यालयावर जाऊन दाखवावे', भाजपच्या केणेकरांचे दानवेंना आवाहन,दानवे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:18 IST2025-06-07T13:17:02+5:302025-06-07T13:18:27+5:30
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरेसेनेने भाजप कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करीत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले.

'शिंदेसेनेच्या कार्यालयावर जाऊन दाखवावे', भाजपच्या केणेकरांचे दानवेंना आवाहन,दानवे म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाने ‘क्या हुआ तेरा वादा’ हे सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. १२ जूनपर्यंत हे आंदोलन चालणार असून, ५ जून रोजी ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करीत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले. त्यामुळे भाजपने त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान, दानवे यांनी आता पालकमंत्री व शिंदेसेनेच्या कार्यालयावर जाऊनही असेच निवेदन द्यावे, असे आवाहन भाजपचे आ. संजय केणेकर यांनी दिले आहे.
आ. केणेकर म्हणाले, मी असतो तर दानवेंना भाजप कार्यालयाची पायरी चढू दिली नसती. त्यांनी सरकारच्या विरोधातील निवेदन शासन, प्रशासनाला द्यायचे. पालकमंत्री, शिंदेसेनेच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊन दाखवावे. याप्रकरणी मी पोलिस आयुक्तांशी बोलून तक्रार दिली आहे. ही दानवेंची दादागिरी आहे. यातून शहरातील राजकीय वातावरण खराब होईल. त्याला दानवे जबाबदार असतील. भाजप कार्यालयात येण्याची त्यांची काहीही गरज नव्हती.
केणेकरांनी हा उपदेश त्यांच्या नेत्यांना द्यावा...
आम्ही कुठे आंदोलन करावे, हे सांगण्यापेक्षा आमदार केणेकरांनी त्यांच्या नेत्यांना उपदेश द्यावा.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते