जयघोषाने शहर दणाणले

By Admin | Updated: February 19, 2015 00:44 IST2015-02-19T00:38:27+5:302015-02-19T00:44:38+5:30

उस्मानाबाद : शिवजयंतीनिमित्त येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या शिवरॅलीत शिवप्रेमींनी दिलेल्या

Glory to the city! | जयघोषाने शहर दणाणले

जयघोषाने शहर दणाणले


उस्मानाबाद : शिवजयंतीनिमित्त येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या शिवरॅलीत शिवप्रेमींनी दिलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने उस्मानाबाद नगरी दुमदुमून गेली. या रॅलीत मुस्लिम बांधवांनीही आपला सहभाग नोंदवून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून दिले. हजारो युवक भगव्या झेंड्यासह या शिवरॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक युवकाच्या हातात एक फुल देवून मुस्लिम बांधवांनी या रॅलीतील सहभागी शिवप्रेमींचे स्वागत केले तसेच यात सहभागही नोंदविला.
उस्मानाबाद येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मागील २५ वर्षांपासून शहरात दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमिक शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. शिवजयंतीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे शिवसप्ताहात अनेक सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी तुळजाभवानी क्रीडा संकुल येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात शिवरॅलीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी मुस्लिम समाजातील बांधवांनी रॅलीत सहभागी असलेल्या प्रत्येक तरूण मावळ्याला पुष्प भेट देवून त्याचा उत्साह वाढवित स्वागत केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या रॅलीस झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी शहरातील विविध पक्ष, संघटनांसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या शिवरॅलीस बुधवारी सकाळी ९.३० वाजता तुळजाभवानी क्रीडा संकुलातून प्रारंभ झाला. यावेळी शहर व परिसरातील सुमारे दीड हजार शिवभक्त मावळे यात सहभागी झाले होते. क्रीडा संकुलातून शिवाजी चौक, भाजी मंडई, आझाद चौक, काळा मारुती चौक, पोस्ट आॅफिस, बार्शी नाका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते शिवाजी चौक या मार्गे ही रॅली काढण्यात आली. समितीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष राजाभाऊ पवार, मार्गदर्शक अभिषेक बागल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घातला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणेने शिवाजी चौक व परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी) ४
काढण्यात आलेल्या शिवरॅलीत सहभागी झालेल्या तरूणांची मौलाना अहेमद साहब, मैनोद्दीन पठाण, सत्तार शेख, हफिज अलीम, शेख मसूद, मौलाना जाफर अली, बिलाल रझवी, शेख जावेद, बशीर तांबोळी, बिलाल तांबोळी, सय्यद खमरोद्दीन, शुजावोद्दीन साहब, समीयोद्दीन मशायक, मौलाना रहेमतुल्ला साहब, अब्बास सर, खालेद रझवी, खलील सय्यद आणि तारेख अजीज यांनी पुष्प भेट देवून स्वागत केले.

Web Title: Glory to the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.