मजुरांच्या कामाचा मोबदला तातडीने द्या
By Admin | Updated: May 3, 2015 00:58 IST2015-05-03T00:45:50+5:302015-05-03T00:58:07+5:30
जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे

मजुरांच्या कामाचा मोबदला तातडीने द्या
जालना : मागेल त्याला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामावरील मजुरांना तातडीने त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा, अशी सूचना मग्रारोहयोचे आयुक्त एम. शंकरनारायणन यांनी केली. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १ मे रोजी आयोजित मग्रारोहयो कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्त एम. शंकरनारायणन म्हणाले की, गतवर्षात मोठ्या प्रमाणात विहिरी उभारण्यावर खर्च झालेला आहे. परंतु विहिरी भौतिकदृष्ट्या पूर्ण नाहीत. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कामाची देयके अदा करण्यात येत असून त्या तुलनेत सिंचन विहिरींच्या कामांची देयके अदा केली नसल्याचे आढळून येते.
याबाबतही अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन विहिरींच्या कामांची देयके अदा करावीत, असेही शंकरनारायणन यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थित होती.