सहा जणांना जन्मठेप
By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:19:11+5:302014-10-11T00:40:59+5:30
औरंगाबाद : सुनील ऊर्फ अण्णा लष्करे हत्या प्रकरणात सहा जणांना जन्मठेप आणि एकूण १ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला.

सहा जणांना जन्मठेप
औरंगाबाद : राजकीय वैमनस्यातून २०११ साली औरंगाबादेतील नगर नाक्याजवळ नेवासा येथील सुनील ऊर्फ अण्णा लष्करे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तिसऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जी. शेटे यांनी सहा जणांना जन्मठेप आणि एकूण १ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला.
शेख राजू गुलाब ऊर्फ राजू जहागीरदार (४५, रा. नेवासा खुर्द, जि. अहमदनगर), शेख एजाज गुलाब ऊर्फ मुन्ना जहागीरदार (३२), शेख जावेद ऊर्फ पेंटर शेख शेरू (३५), मुनीर ऊर्फ मुन्ना निजाम पठाण (रा. अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूर), सय्यद सर्फराज अब्दुल कादर (अहमदनगर), शेख मुश्ताक अहमद गुलाम रसूल, अशी आरोपींची नावे आहेत.
घटनास्थळी पोलिसांना पिस्तूलमधून गोळ्या झाडल्यानंतर खाली पडलेल्या पुंगळ्या, एक छर्रा, मृताच्या अंगावरील कपडे, आरोपीचा मोबाईल सापडला. सापडलेल्या मोबाईलआधारे पोलिसांनी शेख गुलाब ऊर्फ मुन्ना जहागीरदार, मुनीर ऊर्फ मुन्ना पठाण यांना २३ मे २०११ रोजी इंदौर येथे अटक केली. २७ मे २०११ रोजी शेख जावेद ऊर्फ पेंटर यास औरंगाबादेत, तर २९ मे रोजी राजू जहागीदार, सय्यद सर्फराज आणि शेख मुश्ताक अहमद, अल्ताफ अब्दुल कादर यांना पकडले.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
तीन वर्षे चाललेल्या या खून खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा, सोबत असलेला पंधरा वर्षीय मनोज धोत्रे, खडका फाटा येथील पेट्रोलपंपावरील कर्मचारी अमोल शिरसाट, अण्णा यांचे शवविच्छेदन करणारे घाटीतील डॉ. कैलास झिने, मुंबईतील कलिना येथील बॅलेस्टिक सायन्स विभागातील तज्ज्ञ रामटेके यांच्याही साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपींच्या नेवासा येथील घरातून जप्त करण्यात आलेल्या दोन गावठी पिस्तुलांतूनच अण्णांवर गोळीबार झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवाय नेवासा येथील राजू जहागीरदारच्या कार्यालयात १६ मे २०११ रोजी मोहन बापू कुसळकर हा चहा देण्यासाठी गेला असता तेथे आरोपी अण्णांच्या खुनाच्या कटाची चर्चा करीत असल्याचे त्याने ऐकले होते. ही बाब मोहनने पोलिसांना सांगितली. त्यामुळे त्याचीही साक्ष या खटल्यात नोंदविण्यात आली. खटला सुनावणीसाठी आला असता सहायक
निकालावर समाधानी
माझ्या आणि माझ्या चिमुकल्या मुलांच्या डोळ्यासमोर आरोपींनी माझ्या पतीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला आणि सरकारी वकील अॅड. मुगदिया, अॅड. जे.बी. नवले, अॅड. सुनील चावरे यांनी आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मेहनत घेतली. त्यामुळेच आज मला न्याय मिळाला. आरोपींना झालेल्या शिक्षेवर ंमी समाधानी आहे.
-पूजा लष्करे
घटनेची पार्श्वभूमी
१८ मे २०११ रोजी लष्करे, पत्नी पूजा, मुलगी प्रिया, वैष्णवी, मुलगा रुद्र आणि शेजारी राहणारा १५ वर्षीय मनोज धोत्रे हे कारने औरंगाबादला येत होते. खडका फाटा येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यावरून अण्णा आणि दुचाकीचालक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर ते औरंगाबादच्या दिशेने निघाले. दरम्यान, अण्णा यांची कार नगर नाका येथे आली असता मागून आलेल्या एका कारने त्यांच्या कारला धडक दिली.
अण्णा व कारचालकात वाद झाला. त्यानंतर कारचालक मोबाईलवर बोलत कारमध्ये बसून निघाला. त्याचवेळी दोन मोटारसायकलवरून पाच ते सहा जण तेथे आले. त्यापैकी तिघांनी अण्णांचे हात पकडले, तर अन्य तीन जणांनी रिव्हॉल्व्हरमधून अण्णांवर गोळ्या झाडल्या.
पूजा लष्करे यांनी एकाला ढकलले. त्यावेळी एका आरोपीचा मोबाईल तेथे पडला. सर्व आरोपी पळून गेले. घटनेनंतर एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने कुटुंबियांनी अण्णांना घाटीत दाखल के ले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. छावणी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.