‘मुलींनी आत्मविश्वासाने अन्यायाला सामोरे जावे’
By Admin | Updated: June 29, 2014 00:36 IST2014-06-29T00:30:55+5:302014-06-29T00:36:11+5:30
बीड: दिवसेंदिवस महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत आहे.

‘मुलींनी आत्मविश्वासाने अन्यायाला सामोरे जावे’
बीड: दिवसेंदिवस महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत आहे. कितीही कायदे काढले आणि कितीही कठोर कारवाया केल्या तरी विकृत दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहणाऱ्यांवर काहिही परिणाम होणार नाही, यासाठी आपण स्वत:चा आत्मविश्वास जागरूक करावा, आत्मविश्वास हाच माणसाच्या जवळचा खरा मित्र आहे, आपल्यात जर आत्मविश्वासाची शक्ती असेल तर आपण कोणत्याही घटनेला जिद्दीने लढू शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. संगीता धसे यांनी केले.
येथील राजस्थानी विद्यालयात जनाधार प्रतिष्ठाणच्या वतीने ‘महिला सबलीकरण व जागर जाणीव अभियान’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून अॅड. संगीता धसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सचीव रामेश्वर कासट हे होते तर पेठ बीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.एस.सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक रामलाल छाजेड, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री, महिला गस्त पथकाच्या मनीषा राऊत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मुलींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. याला जशास तसा जवाब देण्यासाठी प्रत्येक मुलींनी स्वत:च रक्षण करायला शिकले पाहिजे. तेवढी क्षमता आपल्यात ठेवली तर आपण कोणत्याही पुरूषाशी तोंड द्यायला उभ्या राहू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी उपस्थित मुलींना दिला. ंआई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे कुठलेही वर्तन करू नका, असा सल्ला देत त्यांनी आई-वडिलांशीच घट्ट मैत्री करा असे सांगितले. यावेळी पोनि. सोनवणे, गस्त पथकाच्या मनीषा राऊत यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गस्त पथकाच्या रंजना सांगळे, तन्वीर सय्यद, रमा भालेराव, प्रतिष्ठाणचे विनय मंत्री, ऋषी वर्मा, अक्षय मालपाणी, ओंकार पंडीत, अखील बुंदीले यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री, सूत्रसंचालन अभिजीत गिरी तर आभार अक्षय बनसोडे यांनी मानले. हेल्पलाईन क्रमांकाच्या पत्रकाचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)