घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 18:55 IST2021-02-01T18:54:06+5:302021-02-01T18:55:31+5:30
govermnet hospital ghati घाटीत ११७७ खाटा आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक रुग्ण याठिकाणी भरती असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकून उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती येथे कायम पाहायला मिळते.

घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात घाटीत उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घाटीतील बाह्यरुग्ण विभागासह आंतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडत असल्यानेे रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या चार महिन्यांत तब्बल दीड लाख रुग्णांवर घाटीत उपचार झाले.
घाटीत मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. घाटीत ११७७ खाटा आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक रुग्ण याठिकाणी भरती असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकून उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती येथे कायम पाहायला मिळते. मात्र, कोरोनामुळे उपचार पुढे ढकलण्यावर अनेकांकडून भर देण्यात आला. परिणामी, घाटीत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. जिल्ह्यात ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. त्यामुळे घाटीत नॉन कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली. परिणामी, सध्या वार्डांमध्ये जमिनीवर गाद्या टाकून उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. अस्थिव्यंगोपचार विभागापासून ते मेडिसीन विभागापर्यंत अशीच परिस्थिती आहे.
शस्त्रक्रियांचेही वाढले प्रमाण
नॉन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश वाॅर्ड रुग्णांनी भरले आहेत. शस्त्रक्रियांचेही प्रमाण वाढले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. गेल्या चार महिन्यांत आंतररुग्ण विभागात २२ हजार ९३८ रुग्ण भरती झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
घाटीतील नॉन कोविड रुग्णसंख्या
महिना ओपीडी आयपीडी
ऑक्टोबर २८,५२६ ५३४९
नोव्हेंबर २९,२३५ ५३८५
डिसेंबर ३५,६७९ ६०१८
जानेवारी ३८,१११ ६१८६
एकूण १,३१,५५१ २२,९३८