वैजापूरकरांची धुळीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:31+5:302020-12-30T04:07:31+5:30

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे ...

Get rid of Vaijapurkar from the dust | वैजापूरकरांची धुळीपासून सुटका

वैजापूरकरांची धुळीपासून सुटका

वैजापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वैजापूरकरांची धुळीच्या त्रासापासून सुटका झाली आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे सत्तर टक्के डांबरीकरण झाल्याने शहरवासीयांची खड्डेमय रस्त्यातून मुक्तता झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी शहरातून जाणाऱ्या नाशिक-निर्मल राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले. येवला तालुक्याच्या सीमेपासून ते शिऊर बंगल्यापर्यंत २९ किलोमीटर महामार्गासाठी १२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली; परंतु या महामार्गाच्या क्राँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे अंदाजपत्रकात बदलही झाला. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन झाले. मात्र, या महामार्गाचे डांबरीकरणाचे काम रखडले गेले होते. त्यात यंदा पाऊस चांगला झाला, ही बाब दिलासा देणारी जरी असली तर या पावसाने मात्र राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था केली. रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

-------

धुळीमुळे श्वास गुदमरला

विनायकराव पाटील महाविद्यालय ते नांदगावपर्यंतच्या रस्त्यावर मुरूम व माती टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर दलदल सुरू झाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी व नंतर महामार्गावर धूळ व खड्ड्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हीच परिस्थिती वैजापूर शहरातही निर्माण झालेली होती. वैजापूरकरांना खड्डे व धुळीच्या लोटाचा त्रास सहन करावा लागला. महामार्गालगत असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले. धुळीमुळे शहरवासीयांचा श्वास गुदमरला होता.

------

डांबरीकरण झाले अन् त्रासापासून सुटका

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास ७० टक्के डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात रस्त्याची कामे रखडली होती. त्यानंतर ती सुरळीत होऊ लागली. त्यामुळे वैजापुरातील नागरिकांना खड्डे आणि धुळीतून मुक्तता मिळाली आहे.

------------

फोटो : वैजापूर शहरातील स्टेशन रोडवर आता गुळगुळीत झाला असून वाहनधारकांची धुळीपासून मुक्तता झाली.

Web Title: Get rid of Vaijapurkar from the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.