‘पर्यावरण’ची मान्यता मिळवू

By Admin | Updated: April 8, 2015 00:50 IST2015-04-08T00:48:35+5:302015-04-08T00:50:46+5:30

उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी थांबले आहे. परवानगीसाठी व्यक्तिशा लक्ष घालून दोन दिवसात

Get recognition of 'environment' | ‘पर्यावरण’ची मान्यता मिळवू

‘पर्यावरण’ची मान्यता मिळवू


उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी थांबले आहे. परवानगीसाठी व्यक्तिशा लक्ष घालून दोन दिवसात याबाबतची प्रक्रिया पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिली. उर्वरित १६.३३ टीएमसी पाणी आणण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासंदर्भात झालेल्या या बैठकीला जलसंपदा विभागाच्या प्रधानसचिव मालिनी शंकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, आ. राहुल मोटे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. ज्ञानराज चौगुले, आ. भीमराव धोंडे यांच्यासह सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मराठवाड्याला मिळावयाच्या २३.६६ टीएमसी पैकी पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी आणण्यासंबंधीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी सदरील काम मागील काही महिन्यापासून रखडलेले आहे. याबाबतचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. परवानगीसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून सदर प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये व्यक्तिशा लक्ष घालून येत्या दोन दिवसात परवानगी मिळवू, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
सदर कामासाठी तीन वर्षात ३०० कोटी निधीची आवश्यकता असून, याबाबतची तरतूद करावी, अशी मागणी केल्यानंतर या कामाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान ७ टीएमसी पाणी आणण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असले तरी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कोठून आणणार? हे स्पष्ट करावे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठकीत सांगितले. तंटा लवाद क्र. २ नुसार ८१ टीएमसी पाणी मिळणार आहे. मात्र या ८१ टीएमसी पाण्याच्या वाटणीत मराठवाड्याचा कोठेही उल्लेख नसल्याने मराठवाड्याला द्यावयाचे उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी कधी व कसे येणार? असेही आ. पाटील यांनी या बैठकीत विचारले.
मराठवाड्याला द्यावयाचे १६.६६ टीएमसी पाणी कागदावरच असल्याचे पुढे आल्यानंतर याबाबत सखोल अभ्यास करून पाणी आणण्यासाठी पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान पुण्यातील मुळशी धरणातील पाणी टाटा कंपनी वीज निर्मितीसाठी वापरते. यासाठी वापरलेले ४० टीएमसी पाणी कोकणात वाहून जाते. वाहून जाणाऱ्यापैकी काही पाणी भीमा खोऱ्यात सोडून तेथून त्यातील १६.६६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते, अशी संकल्पना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. याबाबत सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याची तयारी दाखविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही याला होकार देत सदर प्रस्ताव आल्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.

Web Title: Get recognition of 'environment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.