आरक्षणविरोधी संघटनांतून बाहेर पडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:36+5:302021-06-28T04:04:36+5:30
औरंगाबाद : राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जारी केला. त्यामुळे नाउमेद न होता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सिद्ध ...

आरक्षणविरोधी संघटनांतून बाहेर पडा
औरंगाबाद : राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जारी केला. त्यामुळे नाउमेद न होता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा. त्यासाठी आरक्षणविरोधी संघटनांमध्ये कार्यरत असाल, तर अगोदर त्या संघटनांमधून बाहेर पडावे, असे आवाहन स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.
रविवारी ‘पदोन्नतीतील आरक्षण व त्यावरील उपाय’ या विषयावर आयोजित परिसंवादात जे. एस. पाटील बोलत होते. यावेळी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके, महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अशोक ससाणे, रवींद्र जोगदंड, कार्यकारी अभियंता भगत आदींनी मनोगते व्यक्त केली. परिसंवादाचे प्रास्ताविक मिलिंद बनसोडे यांनी केले.
यावेळी पाटील म्हणाले की, आरक्षणाचा लढा आपण न्यायालयात नक्कीच जिंकू. त्यासाठी आपली संघटित शक्ती निर्माण करावी लागेल. आज आपण अनेक आरक्षणविरोधी संघटनांमध्ये विभागलेलो आहोत. या संघटना आपले प्रश्न सोडविण्याऐवजी ते अधिक अडचणीचे होतील किंवा ते सुटणारच नाहीत, यावरच काम करीत आहेत. त्यामुळे अशा संघटनांचे सामूहिक राजीनामे देऊन बाहेर पडा. आपणास संघटितपणे हा लढा लढवा लागणार आहे. अडीच ते तीन लाख सदस्य संख्या असलेले राष्ट्रीय पातळीवर आपले ‘स्वतंत्र मजदूर युनियन’ हे व्यासपीठ आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तराव या संघटनेला मान्यताप्राप्त होण्यासाठी पाच लाख सदस्य संख्येची गरज आहे. ही संघटना न्यायालयासाठी लागणारा ‘डाटा’ सरकारकडून जमा करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. पदोन्नतीतील आरक्षण मिळण्यासाठी यापूर्वीही या संघटनेच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढली आहे. त्यामुळे आरक्षणविरोधी शक्तीविरुद्ध लढण्यासाठी आपली प्रबळ संघटित शक्ती उभी करण्यावाचून पर्याय नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय घनबहादूर यांनी केले. या परिसंवादात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.