चारा छावण्यांसाठी प्रतिसाद मिळेना
By Admin | Updated: July 29, 2015 00:49 IST2015-07-29T00:41:27+5:302015-07-29T00:49:04+5:30
लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाई बरोबर तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे आहे ते पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे़

चारा छावण्यांसाठी प्रतिसाद मिळेना
लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाई बरोबर तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे आहे ते पशुधन कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाने चारा छावण्या सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांसह बाजार समित्या व सेवाभावी संस्थांना गळ घातली आहे़ मात्र, अद्याप एकाही संस्थेने प्रतिसाद दिला नाही़
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी झाला आहे़ यंदा तर पावसाळ्याचे दोन महिने उलटत आहेत़ परंतु पाऊस झाला नाही़ मृग नक्षत्रात थोडा पाऊस झाला होता़ त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या़ मात्र त्यानंतर पावसाने ताण दिला आहे़ पेरलेल्या पिकावरही नांगर शेतकऱ्यांनी फिरवलेला आहे़ यंदाचा खरीप हंगामच उद्ध्वस्त झाला आहे़ प्यायलाही पाणी नाही, अशा स्थितीत पशुधनाला कसे जगवावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था यांना आवाहन केले होते़ जिल्ह्यातील तहसीलदारांकडे व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचे सुचित केले होते़ किमान ३०० जनावरांच्या चाऱ्याची, पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था होईल, असे ठिकाण निवडून प्रस्ताव सादर करावेत, अशी गळ सदर संस्थांना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घातली होती़ मात्र त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील कोणत्याही संस्थेने प्रतिसाद दिलेला नाही़ लातूर जिल्ह्यात अनेक मोठमोठे सहकारी साखर कारखाने आहेत़
सहकारी संस्थाही मोठ्या आहेत़ परंतू त्यातील एकाही संस्थांना मुक्या जनावरांची किव आलेली नाही़ विशेष म्हणजे प्रस्ताव दाखल केल्यानंर वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत संबंधीत संस्थेला आर्थिक मदत देण्याचे नियोजन आहे़ तरीही एकाही संस्थेने बांधीलकी पत्करली नाही़ कृषी कार्यालयाच्या वतीने १० हजार हेक्टरवर वैरणीचे नियोजन केले आहे़ शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे़ त्यासाठी कृषी विभागामार्फत मका बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे़ परंतु मका पेरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी नाही़ अल्प पाण्यात हा चारा जरी येत असला तरी तेवढेही पाणी नसल्याने शेतकऱ्यांनेही अद्याप वैरण विकास कार्यक्रमांतर्गत मका बियाणाची मागणी केलेली नाही़
ऊस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तीन ते चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ऊस उत्पादक संघ स्थापन करावा़ जेणेकरुन चारा टंचाईवर मात करता येईल, अशा शेतकऱ्यांनी संघामार्फत चारा छावणीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश होते़ परंतू ऊस उत्पादक शेतकऱ्यांनेही चारा छावण्यासाठी संघ स्थापन केला नाही़ (प्रतिनिधी)